व्हिक्टोरिया – भारताबाहेर देशाचे नाव उज्ज्वल करणारे भारतीय नेहमीच चर्चेत राहतात. अमेरिकेत सध्या तोंडावर असलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत प्रक्रियेत मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदासाठी नशीब आजमावत आहेत. त्या जर निवडून आल्या तर अमेरिकेच्या इतिहासातला तो ऐतिहासिक विक्रम ठरणार आहे. मॉरिशस किंवा अन्य काही राष्ट्रांच्या प्रमुखपदी अनेकदा भारतीय अथवा भारतीय वंशाच्या व्यक्तींनी आपले योगदान दिले आहे.
अशातच आता मूळचे बिहारचे असलेले वैवेल रामकलावन यांची सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. भारतापासून चार हजार किलोमीटर दूर असणाऱ्या सेशेल्स देशात बिहारच्या या व्यक्तीने प्रमुखपदी येत एक नवा इतिहास रचला आहे. सेशेल्समध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वैवेल रामकलावन यांना 54 टक्के मतं मिळाली आहेत. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी डॅनी फॉरे यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला आहे, तर त्यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या बरौली येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैवेल रामकलावन यांच्या पूर्वज जवळपास 135 वर्षांपूर्वी गाव सोडून, कलकत्ता मार्गे मॉरीशसला पोहचले होते. असे ग्रामस्थांनी सांगितलं आहे.
दुर्दम्य आशावाद…
वैवेल रामकलावन यांचे घर गोपालगंज येथील बरौली क्षेत्रातील परसौनी येथे आहे. इथे ते साधारणपणे दोन वर्षांअगोदर आले होते. दोन वर्षांपूर्वी ते जेव्हा आपल्या मूळ गावी आले होते, तेव्हा त्यांनी येथील मातीचा टिळा लावला होता व “आपण गावकऱ्यांचे प्रेम कधीच विसरणार नाही’, असे म्हटले होते. शिवाय, त्यांनी गावी पुन्हा येण्याचे देखील म्हटले होते. त्यावेळीच त्यांनी “मी जेव्हा पुन्हा येईल तेव्हा राष्ट्राध्यक्ष बनून येईन’, असा आत्मविश्वास व्यक्त केला होता. ही प्रतिज्ञा आता सत्यात उतरल्याने आणि गावाचा एक पुत्र एका देशाचा राष्ट्रपती बनला असल्याने सर्व ग्रामस्थ उत्सव साजरा करत आहेत.