ग्वालियर (मध्य प्रदेश) Vaishnavi Sharma : ग्वालियरची डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्मा सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय बनली आहे. भारतीय महिला अंडर-१९ संघात निवड झाल्यानंतर अंडर-१९ टी२० महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेत तिने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच ‘हॅटट्रिक’ करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
पाचव्या वर्षांपासून क्रिकेट | Vaishnavi Sharma
वैष्णवीने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ग्वालियरच्या तानसेन क्रिकेट अकादमीतून तिने आपल्या क्रिकेट जगतातील प्रवासाला सुरुवात केली. डावखुरी फिरकी गोलंदाज म्हणून तिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली. अष्टपैलू कामगिरीमुळे तीने प्रशिक्षकांचा विश्वास संपादित केला.
आई वडिलांची खंबीर साथ
वैष्णवीच्या यशात तिच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. तिचे वडील डॉ. नयन शर्मा, ज्योतिषशास्त्राचे शिक्षक आहेत. वडील व गृहिणी असलेल्या आईने तिला कायमच क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. आपल्या मुलीला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी त्यांनी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.
वैष्णवीची चमकदार कामगिरी | Vaishnavi Sharma
२०१७ मध्ये मध्य प्रदेश अंडर-१६ संघातून वैष्णवीने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले.
त्यानंतर मध्य प्रदेशच्या सीनियर संघात खेळताना ती चमकली.
अंडर-१९ संघाची कर्णधार म्हणून तिने संघाला अनेक विजय मिळवून दिले.
२०२२-२३ मध्ये तिने घरगुती स्पर्धांमध्ये प्रभावी गोलंदाजी करत बीसीसीआयचा डालमिया पुरस्कार पटकावला.
पदार्पणातच इतिहास
मलेशियाविरुद्धच्या सामन्यात वैष्णवीने ५ धावांत ५ बळी घेत अप्रतिम कामगिरी केली. विशेष म्हणजे, १४व्या षटकात तिने सलग तीन चेंडूंवर तीन गडी बाद करत पदार्पणातच हॅटट्रिक करत नवा विक्रम प्रस्थापित केला.
ग्वालियर-चंबळ विभागातून वैष्णवी पहिली महिला क्रिकेटपटू | Vaishnavi Sharma
ग्वालियर-चंबळ विभागातून भारतीय भारतीय संघात स्थान मिळवणारी वैष्णवी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली होती. अशातच तिने मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवल्याने मध्य प्रदेशच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय महिला संघाच्या या दमदार फिरकीपटूकडून आता आगामी सामन्यांमध्ये अधिक भेदक कामगिरीची अपेक्षा आहे.
५ धावांत ५ बळी! पदार्पणातच वैष्णवीची हॅटट्रिक, भारताचा मलेशियावर दणदणीत विजय