कुमार टेनिस स्पर्धेत वैष्णवी आडकर उपांत्य फेरीत

पुणे: गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या भारताच्या देव जावीयाने तर, मुलींच्या गटात वैष्णवी आडकर या खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत संदीप्ती सिंग रावचा 6-4, 4-6, 7-6 (11-9) टायब्रेकमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. जपानच्या मई हासेग्वा हिने थायलंडच्या लांलाना तारारुडीचा 2-6, 7-5, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. चीनच्या थियांमी मी हिने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या तोमको कातोला 6-3, 6-3 असे पराभूत केले. रशियाच्या मारिया शोल्कोवा हिने चीनच्या झिजून जियांगचे आव्हान 6-3, 6-1 असे संपुष्टात आणले.

मुलांच्या गटात भारताच्या देव जावीया याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अर्णव पतंगेचा टायब्रेकमध्ये 6-0, 7-6 (5) असा पराभव करून आगेकूच केली. कझाकस्तानच्या रोस्टीस्लाव गॅलफिंगर याने भारताच्या आर्यन भाटियाला 7-6 (4), 3-6, 6-4 असे नमविले. थायलंडच्या पेटॉर्न हंचायकुल याने भारताच्या उदित गोगोईचा 6-1, 6-2 असा तर, चेक प्रजासत्ताकच्या वितेक होरक याने न्यूझीलंडच्या जॅक लौतीतचा 6-3, 6-1 असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात भारताच्या आर्यन भाटिया व उदयवीर सिंग या जोडीने निशांत दबस व पेटॉर्न हंचायकुल यांचा 6-4, 6-3 असा तर, कझाकस्तानच्या रोस्टीस्लाव गॅलफिंगरने भारताच्या देव जावीयाच्या साथीत चिराग दुहान व डेनिम यादव या जोडीचा 7-5, 4-6, 10-5 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. मुलींच्या गटात तैपेईच्या युयुन लीने भारताच्या विपाशा मेहराच्या साथीत जपानच्या मई हासेग्वा व तोमको कातोयांचा 7-6(2), 6-4 असा तर, मारिया शोल्कोवा व किरारा मोरीओका यांनी स्किया कुंग व चाओ यि वांग यांचा 6-3, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.