कलंदर: वैष्णव ते शैव?

उत्तम पिंगळे

कृष्णराव एकटेच बागेतील बाकड्यावर बसलेले पाहून मुरलीधर तेथे जातात. दिल्लीत राजकीय उन्हाळाही वाढलेला आहे व इंडिया गेट मागे सूर्य अस्ताला जात असताना मुरलीधर तेथे पोहोचतात.
कृष्णराव : ये… ये… मुरली बैस येथे.
मुरलीधर : हे काय चालले आहे? म्हणजे गरज सरो नि वैद्य मरो?
कृष्णराव : अरे! काय एवढा उद्वेग कशासाठी मी म्हणतो?
मुरलीधर : हे बघा, मी गप्प बसणार नाही सत्तेची एवढी नशा आली का?
कृष्णराव : हे बघ, जरा शांत बस. डोळ्यात राग घेऊ नकोस. तुझे उगा प्रेशर वाढेल.
मुरलीधर : नाही. हे तुला तरी पटतेय का, आपण पक्ष बांधणीमध्ये किती काम केले?
कृष्णराव : मला माहीत नाही का? अरे गेली पाच वर्षे मी फक्‍त संसदेत बसलेला आहे. वाटलं होतं की महत्त्वाचे पद मिळेल. पण आता सारे बदलत चालले आहे.
मुरलीधर : म्हणून काय झाले? अरे आपण जिद्दीने पक्ष बांधणीस लागलो. मी स्वतः प्राध्यापक असूनही या क्षेत्रांमध्ये पडलो. एक एक कार्यकर्ता आणून आपण पाया रचला. सुरुवातीला आपल्या पक्षाला थोड्याच जागा मिळाल्या. पक्ष संपला असा वाटलं होतं. पण आपण मग एक एक कार्यकर्ता गोळा केला देशाचा कानाकोपरा पालथा घातला. वेळोवेळी पदरमोड करून पक्ष हळूहळू उभा केला.
कृष्णराव : अरे हे तू मला सांगतोस? मीही पक्षाध्यक्ष होतो. तळागाळातून कार्यकर्त्यांची फौज गोळा केली. मी स्वतः देशभर रथयात्रा केली. मोठ्या पदापर्यंत पोहोचलो पण आता कुणीही विचारत नाही याचीच खंत वाटते.
मुरलीधर : काय तर काय म्हणतात की आपली वये झाली, पण कुणीतरी आधी विश्‍वासात तर घ्यायला हवे होते? तांदळातील खड्यासारखं बाजूला फेकलो गेलो. डोक्‍यावर कुणाला घेत आहेत? कालच्या पोरांना, आयात केलेल्या उमेदवारांना? ते काही नाही यावेळी आवाज उठवायलाच हवा.
कृष्णराव : मुरली जरा शांतचित्ताने विचार कर. आता कोणता उठाव करणार? आणि कोण आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत?
मुरलीधर : हो पण हे असं? याचा आता जाहीर जाब विचारावाच लागेल.
कृष्णराव : नको असा विचार करून मनस्ताप करून घेऊ. आता आपली वये झालेली आहेत. मी 91 व तू 85 पार. मग त्याचाही विचार करावा लागेल. तू प्रोफेसर होतास ना? तुझ्या भाषेत सांगतो. पूर्वीचे विचार कसे होते, ज्याने आपल्याला आधार दिला त्यास पुढे बरोबर घेऊन जाणे. ज्या शिडीवरून आपण चढून वर गेलो ती नंतर उचलून खांद्यावर घ्यायची नसते. त्याचे आपल्यालाच ओझे होते. ती शिडी थेट खाली ढकलून द्यायची म्हणजे आपला मार्ग निर्धोक होतो, दुसरे कुणी आपल्या मागे येऊ शकत नाही.
मुरलीधर : तू म्हणतोस ते थोडं थोडं पटू लागले मला. बघ राम हा विष्णूचा अवतार. तुझ्यात कृष्ण आहे व मीही मुरली म्हणजे कृष्णचं म्हणजे पर्यायाने विष्णूचं कारण कृष्णही विष्णूचाच अवतार आहे. म्हणजे आता विष्णू पर्व बाजूला होऊन शिवपर्व म्हणजेच वैष्णव जाऊन शैव येत आहेत असं वाटतं आहे.
(दोघंही एकमेकांकडे पाहून विषादपणे हसतात. समोरच इंडिया गेट मागे सूर्य अस्ताला चालला असतो.)

Leave A Reply

Your email address will not be published.