छोट्या पडद्यावर आणखी एक गाण्याचे नवीन पर्व सुरू होत आहे. या नवीन पर्वाचे नाव “मी होणार सुपरस्टार ः छोटे उस्ताद’ असे आहे. या अनोख्या कार्यक्रमात 5 ते 14 वयोगटातील छोट्या उस्तादांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे. सचिन पिळगावकर यांना आपण याआधी जजच्या भूमिकेत पाहिले आहे. मात्र, सिंगिंग शो ते पहिल्यांदाच जज करणार आहेत. तर वैशाली सामंत तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा जजच्या भूमिकेत दिसतील.
या कार्यक्रमाविषयी सचिन पिळगावकर म्हणाले, मी आजवर पार्श्वगायक म्हणून 200 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. मी बऱ्याच गाण्यांचे संगीत दिग्दर्शनही केले आहे. मात्र, मी सिंगिंग शो आजवर जज केलेला नाही. “मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच सिंगिंग शो जज करणार आहे. त्यामुळे खुपच उत्सुकता आहे. लहान मुलांसोबत त्यांच्या जगात हरवण्याची संधी हा कार्यक्रम नक्की देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.