वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबची कबड्डी खेळाडू वैभवी राजू जाधव हिची महाराष्ट्र कुमारी गट कबड्डी संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली. उत्तराखंड येथे ८ ते ११ जानेवारी दरम्यान झालेल्या ५० व्या कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये वैभवीने महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली आहे. निवडीनंतर तिच्यावर जिल्हा तसेच वाघोली परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाघोली ग्रामस्थांच्या वतीने जाधव हीचा सत्कार करण्यात आला.
वैभवी जाधव वाघेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर मागील ६ ते ७ वर्षांपासून सराव करीत आहे. महाराष्ट्र नुकत्याच झालेल्या सांगली येथील महाराष्ट्र राज्यस्तरीय कुमार कुमारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये पुणे ग्रामीण संघाचे कर्णधार पद सांभाळत असताना चमकदार कामगिरी करून संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. या स्पर्धेतून २४ खेळाडूंचा राज्याचा संघ निवडला गेला.
मुंबई येथे सराव शिबीर होऊन अंतिम १२ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला असून या संघाचे नेतृत्व वैभवी जाधवने केले आहे. मागील वर्षीदेखील महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये तिची निवड करण्यात आली होती. यावेळी तिने कर्णधार पदाची धुरा सांभाळली आहे. वाघोली ग्रामस्थांच्या वतीने जाधव हीचा विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच महिला वर्गांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वाघोली मधील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
वाघोलीच्या वैभवात भर पाडणाऱ्या विविध क्षेत्रांपैकी क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र कबड्डी संघाचा कर्णधाराचा बहुमान पटकावल्याबद्दल वाघोलीकरांना वैभवी जाधव हिचा सार्थ अभिमान आहे. गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा नावलौकिक तिने करावा हीच सदिच्छा.
मीना संजय सातव पाटील
व्हा. चेअरमन, वाघोली ग्रामविकास विविध कार्यकारी सेवा संस्था