पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघच्या निवडणुकीतून आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकुण १६ उमेदवार राहिले आहेत. या मतदार संघाच्या निवडणुकीत प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे सुनील टिंगरे विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे या अधिकृत उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे.
या मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ११२ उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती. त्यात ५६ उमेदवारांनी अर्ज नेले होते. २४ जणांनी ३४ अर्ज भरुन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जांच्या छाननीत सर्वच्या सर्व म्हणजेच २४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. अर्ज माघारीच्या मुदतीत एकुण आठ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यात सहा अपक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले गट, सैनिक समाज पार्टी या अन्य दोन पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या सुनील खांदवे, आम आदमी पक्षाच्या हारुन मुलाणी यांनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नसतानाही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, या दोघांनीही अखेर उमेदवारी मागे घेतली आहे.
निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार –
सुरेंद्र पठारे (अपक्ष), सुनील खांदवे (अपक्ष), सुनील अंधारे (सैनिक समाज पार्टी), अशोक जगताप (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले गट), हारुन मुलाणी (अपक्ष), शईबाझ हुसैन अब्दुल कय्युम चौधरी (अपक्ष), विनोद वैरागर (अपक्ष), आशा चौधरी (अपक्ष).
रिंगणात असलेले उमेदवार –
बापूसाहेब तुकाराम पठारे (राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष), सुनील टिंगरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस- अजित पवार पक्ष), हुलगेश चलवादी (बहुजन समाज पार्टी), विवेक लोंढे (वंचित बहुजन आघाडी), चंद्रकांत सावंत (बहुजन समाज पार्टी-आंबेडकर), विनोद कुमार ओझा (हिंदू समाज पार्टी), संजय पडवळ (भारतीय नव जवान सेना पक्ष), सतीश पांडे (राष्ट्रीय समाज पक्ष), सचिन कदम (विकास इंडिया पार्टी), शेषनारायण खेडकर (भारतीय जवान किसान पार्टी), अनिल धुमाळ (अपक्ष), बापू बबन पठारे (अपक्ष), अभिमन्यू गवळी (अपक्ष), राजेश इंद्रेकर (अपक्ष), मधुकर गायकवाड (अपक्ष), शशिकांत राऊत (अपक्ष).
डमी उमेदवारही रिंगणात –
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे यांच्या नावाशी सुसंगत असे नाव असलेल्या अहमदनगरमधील श्रीगोंदा येथील रहिवासी असलेल्या बापू बबन पठारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी हा अर्ज कायम ठेवला आहे.