पुणे : मूलभूत सोयी सुविधा, रस्ते, मेट्रो, मध्यवर्ती शासकीय इमारत, जिल्हा न्यायालय, जमा बंदी आयुक्त कार्यालय, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल, सुसज्ज आणि अद्ययावत मनोरुग्णालय अशा विकास कामांमुळे येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर येरवड्याचे महत्त्व वाढणार आहे. तसेच, त्यामुळे येरवड्याचे रुपडे पालटणार असून येरवड्याची जनमानसात असलेली प्रतिमाही बदलणार असल्याचा विश्वास आमदार सुनील टिंंगरे यांंनी व्यक्त केला.
वडगावशेरीचे महायुतीचे उमेदवार टिंगरे यांच्या प्रचारार्थ येरवडा भागात पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी या भागातील नागरिकांनी टिंगरे यांच्या कामाचे विशेष कौतूक करत त्यांचे आभारही मानले. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिंगरे म्हणाले की, या भागात जीएसटी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले आहे. मध्यवर्ती इमारतीसाठी निधी दिला असून त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मेट्रो स्टेशनचे रखडले होते. त्यासाठी महामेट्रो, महापालिका प्रशासन यांच्याशी समन्वय साधून ते मार्गी लावले. रस्त्यावर असणाऱ्या भाजी मंडईमुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
तसेच, येथील विक्रेत्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी सुसज्ज अशी भाजी मंडई व व्यापारी संकुलासाठी १० कोटींचा निधी आणला आहे. त्या ठिकाणी चारशे गाळे बांधण्यात येणार आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनतळ, अवजड वस्तु व नागरिकांसाठी लिफ्ट, खरेदीला येणाऱ्या महिलांना लहान मुलांची काळजी घेता यावी यासाठी दोन हिरकणी कक्ष अशी उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे छोट्या व्यापाऱ्यांना आणि भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध होऊन शेकडो कुटुंबांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे टिंगरे यांनी सांगितले.