पुणे :- विश्रांतवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला जाईल, असे आश्वासन वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार टिंगरे यांंच्या प्रचारार्थ येरवड्यातील आंबेडकर सोसायटी फुलेनगर, शांतिनगर, प्रतीकनगर भागात पदयात्रा काढण्यात आली होती. या वेळी टिंगरे यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांना मागील पाच वर्षांत केलेल्या कामांची, तसेच मतदारसंघात पुढील पाच वर्षांतील नियोजित कामांची माहिती दिली. या वेळी नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
या भागातील विविध समाजमंदिरांसाठी, तसेच येथील समस्या सोडविण्यासाठी आमदार टिंगरे यांनी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला असल्याचे या कामाचे नागरिकांनी कौतुक केले. माजी नगरसेविका शीतल सांवत, अजय सावंत, मंगेश गोळे, सुभाष चव्हाण, भगवान जाधव, सागर कांबळे, राहुल जाधव, आनंद शिंदे, सिद्धार्थ कांबळे, अरविंद चव्हाण, अरविंद गुजर, दाजी शेटकर, महमूद खान, सुरेश नायर, संदीप पवार, भूषण सोनावणे यांच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
टिंगरे म्हणाले, येरवडा, विश्रांतवाडी भागात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची शहरातील सर्वांत मोठी मिरवणूक विश्रांतवाडी येथे होत असते. त्यामुळे येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचे नियोजन आहे.
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विश्रांतवाडी-कळस परिसराचा कायापालट करणार – आमदार सुनील टिंगरे
याशिवाय मनोरुग्णालय वसाहतीमध्ये सभामंडप, शौचालय, आंबेडकर वसाहत, पंचशीलनगर, प्रतीकनगर भागातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी वाहिन्या, त्रिरत्न बौद्ध विहाराचे बांधकाम, विविध समाजमंदिरांसाठी निधी उपलब्ध करून देणे, अशी कामे या भागात केली असल्याचेही टिंगरे म्हणाले.