नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना लखनौमध्ये पोलीसांकडून धक्काबुक्की झाल्याच्या पार्श्वभुमीवर प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी आपल्या पत्नीचे समर्थन केले आहे.
अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीला जाणे हा काही गुन्हा नाही, असे वढेरा यांनी म्हटले आहे. उतर प्रदेशात “सीएए’ आंदोलनात अटक झालेले माजी पोलीस अधिकारी एस.आर. दरापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना काही पोलीस महिलांनी प्रियांका गांधी यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता.
त्या घटनेचा व्हिडीओ वढेरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. “प्रियांका यांना झालेल्या धक्काबुक्कीमुळे मी अस्वस्थ आहे. एकीने प्रियांकाचा गळा पकडला होता. तर दुसऱ्या पोलीस महिलेने ढकलल्याने प्रियांका पडली. मात्र तरिही आपला निर्धार न सोडता पोलीस अधिकारी एस.आर. दरापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी स्कूटरवरून गेली.’ असे वढेरा यांनी लिहीले आहे.
ज्या लोकांना मदतीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचून दयाळूपणा दाखवल्याबद्दल आपल्याला प्रियांकाचा अभिमान वाटतो. जे केले ते योग्यच केले आणि अडचणीत असलेल्या लोकांबरोबर असणे हा गुन्हा नाही, असेही वढेरा यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांनी फेटाळला आहे.