चंद्रकांत टिंगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
पुणे – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या धानोरीच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ऍड. भगवान जाधव यांनी कार्यकर्त्यांसह आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपचे नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, टिंगरे यांच्या पक्ष प्रवेशाचे आमदार तसेच विद्यमान उमेदवार जगदीश मुळीक यांनी स्वागत केले असून गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप वेगाने वाढला आहे. या वडगावशेरी मतदार संघामध्ये सर्वाधिक ताकद ही भाजपची आहे.
गेल्या दोन महिन्यांत जवळपास सहा हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच या मतदार संघामध्ये हजार पेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली आहे. मतदार संघामध्ये भाजपचे 14 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे तीन नगरसेवक आहे.
वडगावशेरी हा भाजपचा बालेकिल्ला बनल्याचे मत मुळीक यांनी या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी सांगितले आहे.