विवाह समारंभातील शिल्लक अन्नाची नासाडी!

पुणे-मुंबई महामार्गालगतची स्थिती : मोकाट प्राण्यांमुळे अपघाताचा वाढला धोका


-महादेव वाघमारे

वडगाव मावळ – राज्यभर दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असताना मावळ तालुक्‍यातील मंगल कार्यालयातील विवाह समारंभातील शिल्लक अन्नामुळे प्रदूषण होत आहे. याशिवाय जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत टाकलेल्या अन्नामुळे मोकाट पशूपक्षी वर्दळ वाढतेय, त्यामुळे अपघाताचा धोका संभावतो. वाढती “मंगल’ संस्कृती कार्यालयातील होणाऱ्या विविध समारंभातील अन्नाची नासाडी रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरिश दानवे यांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे आणि मुंबई या दोन महानगरांच्या मध्यवर्ती असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेल्या नैसर्गिक आणि भौतिक साधनसंपत्तीने मुबलक असलेल्या मावळ तालुक्‍यात विवाह समारंभात श्रीमंतीचे ओगळवाणे दर्शन घडविण्याची स्पर्धाच लागली आहे. लग्नपत्रिका, मिरवणुकीसाठी डीजे, डॉल्बी, रथ, हत्ती, घोडे, उंट, ढोल व लेझीम पथक, वर-वधूंच्या अंगावरील दागिने, मानपान, महागडे लॉन्स व मंगल कार्यालय आदींचा लाखोंचा खर्च करून विवाह सोहळ्यांचा थाट केले जातो.

वऱ्हाडी व पाहुण्यांसाठी स्वादिष्ट जेवण ठेवण्यात येते. विवाह समारंभात येणाऱ्या वऱ्हाडी व पाहुण्यांचा अंदाज येत नसल्याने मंगल कार्यालयात अन्नाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. शिल्लक दूषित अन्न लॉन्स अथवा मंगल कार्यालयातील कर्मचारी जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत टाकत असल्याने ते अन्न खाण्यासाठी मोकाट जनावरे, कुत्री व डुकरे येतात. त्यांच्या भांडणे होत असल्याने अचानक ती जनावरे महामार्गावर येत असल्याने दुचाकीस्वाराला धडकून अपघात होतात. त्यातून दुचाकीस्वारांबरोबरच मोकाट जनावरांनाही जीव गमवावा लागतो.

वायुप्रदूषणात होतेय वाढ…

काही ठिकाणी हे अन्न ओढ्याच्या ठिकाणी टाकले जात असल्याने त्या परिसरात तीव्र दुर्गंधीयुक्‍त वास येतो. तोच कचरा अनेकदा जाळून टाकला जातो त्यामुळे महामार्गावर धुरांचे लोट फसरले जातात. धुरांमुळे अपघाताचा धोका वाढतो. अनेक भागात जनतेला एकवेळ जेवण्यासाठी अन्न मिळत नाही. मात्र मंगल कार्यालयात होणारी अन्नाची नासाडी विचार करण्यास भाग पाडत आहेत, ही अन्नाची नासाडी रोखण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश दानवे, दिनेश पगडे, शरद मोरे, शरद मालपोटे, विशाल वहिले, बाळासाहेब शिंदे यांनी केली.

बऱ्याचदा मोकाट जनावरे दूषित अन्न खाण्यासाठी अचानक महामार्गावर येतात. अवजड वाहनांना धडकून जनावरे गंभीर जखमी होवून मृत्युमुखी पडतात. मंगल कार्यालय शिल्लक दूषित अन्न महामार्गाच्या बाजूला टाकण्याने ते अन्न कुजून तीव्र दुर्गंधीयुक्‍त वास येतो, तर ते दूषित अन्न खाल्ल्याने जनावरे, कुत्री व डुकरे मृत्यूच्या घटना घडतात. हे दूषित अन्न प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत टाकले जात असल्याने जनावरे प्लॅस्टिकच्या पिशाव्यासह दूषित अन्न खातात. त्यामुळे पशु-पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो.

“आम्ही रेल्वे, बस स्थानकामध्ये उपाशी असलेल्या बेवारस वृद्धांना तसेच गरजूंना मिळेल, त्या मंगल कार्यालयातील उरलेले अन्न गोळा करून खाण्यासाठी देतो. मंगल कार्यालयाच्या भोजन कक्षामध्ये अन्नाच्या महती विषयीचे घोषवाक्‍य लावावे. अन्न वाया जाणार नाही, याबाबत जनजागृती करणे, आवश्‍यक आहे.दूषित अन्न उरलेच, तर ते जमिनीत खड्‌डा घेवून त्यात पुरावे.
– हरीश दानवे, जागरूक नागरिक.

मंगल कार्यालयाचे मालकच दोषी – वहिले

मावळातील बहुतेकदा मंगल कार्यालयातील शिल्लक दूषित अन्न महामार्गालगत होणाऱ्या अपघाताला मंगल कार्यालयाचे मालकच दोषी असून, त्यांच्यावर कारवाई करावी. महाराष्ट्रात दुष्काळ असून, मान्सून लांबणीवर असताना अन्नाची होणारी नासाडी मानवाच्या विनाशाचे पाउल आहे, असे माजी उपसरपंच विशाल वहिले यांनी सांगितले.

“शेतकरी खूप कष्टाने अन्नधान्य पिकवतो, ते धान्य सहजासहजी वाया घालताना आपण त्या शेतकऱ्याचे कष्टच वाया घालत असतो. शिल्लक अन्न घेवून जाणाऱ्या सामाजिक संस्था कार्यरत असून, त्यांना संपर्क केल्यास तेच अन्न कोणाच्या तरी पोटात जाईल. आणि अन्नाची नियमित होणारी नासाडी थांबली जाईल. याशिवाय स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई केल्यास अन्न नासाडीला चाप बसेल. प्रदूषण विभाग, तर निद्रिस्त असून, त्यांना जग केव्हा येईल.
– दिनेश पगडे, प्रगतशिल शेतकरी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.