पालिकेत गाव जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
सर्वच्या सर्व सात जागांवर सामोपचाराने निवड
कोंढवा – पूर्व हवेली तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे महानगरपालिकेच्या उंबरठ्यावर असलेल्या वडाचीवाडी गावाचा पालिकेत समावेश होत असल्याने निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला खूपच अल्प कालावधी मिळणार आहे, त्यामुळे निवडणुकीवरून गावात वाद-विवाद, भांडण, तंटे व पैशाचा अपव्यय होण्यापेक्षा आपआपसांत सर्वसंमतीने नागरिकांनी मिळून सातही ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून देत ग्रामपंचायत निवडणुकीची केवळ फॉर्मेलिटी पूर्ण करीत हवेली तालुक्यात वडाचीवाडी गावाने एक वेगळा आदर्श निर्माण केला.
हवेली तालुक्यातील वडाचीवाडी गाव महापालिकेत समावेश होण्याबाबतची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी एकत्र येत गावची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. वडाचीवाडी ग्रामपंचायत सात सदस्यीय आहे, या निवडणुकीत सातही सदस्य नागरिकांनी बिनविरोध निवडून दिले आहेत. यामध्ये कांचन बांदल, स्मिता बांदल, उर्मिला घुले, राधिका धनवडे, नवनाथ लोखंडे, प्रेम बांदल, महेश बांदल हे सात सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
गावची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माजी सरपंच संदिप बांदल, दत्तोबा बांदल, लक्ष्मण बांदल, दत्तात्रय बांदल, तानाजी धनवडे, बबन बांदल, जिजाबा बांदल, अंकुश बांदल, जालिंदर लोखंडे, उद्धव बांदल, प्रशांत बांदल, नवनाथ चव्हाण, संजय चव्हाण, सोमनाथ चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंडळींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
राज्य शासनाने 23 गावांच्या समावेशाची अधिसूचना जारी केल्याने आमच्या गावाचा पुणे महापालिकेत समावेश होणार हे निश्चित झालेले आहे. परंतु, ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने व गाव अद्यापही पालिकेत समाविष्ट झाले नसल्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे. ही निवडणूक घेण्याला आम्ही कडाडून विरोधही केला होता. परंतु, आयोगाने आमची मागणी मान्य न करता निवडणूक जाहीर केली.
निवडणूक जाहीर झाल्याने गावकी-भावकीत पुन्हा गट-तट, वादविवाद होण्यापेक्षा व पैशाचा अपव्यय होण्यापेक्षा गावच्या हितासाठी आम्ही सर्वजण एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले. त्यानुसार सर्वांनुमते सातही उमेदवार बिनविरोध निवडून दिले. त्यामुळे गावात एकोपा राहुन गावच्या विकासाला नवी चालना मिळाली असल्याचे माजी सरपंच संदिप बांदल यांनी सांगितले.