‘वडाची पांगरी’ जेव्हा झाड गावाची ओळख होते…

महामार्ग निर्मितीच्या वेळी वडाचे झाड वाचविण्याचा संघर्ष

गणेश डुकरे

पांगरी : देशभरात सगळीकडेच रस्त्याचे मोठे जाळे विणले जात असताना मोठे जाळे करून दुतर्फा उभे असलेली झाडे बिनधास्त तोडली जात आहेत, मग ती झाडे छोटी असोत की मोठी. शेकडो वर्षाची वडाची झाडे सुद्धा तोडली गेली.

असेच एक वडाचे झाड या रस्त्यात आले पांगरी गावच्या फाट्यावर. जिंतूर – परभणी रोडवर जिंतूर पासून 5 किमी अंतरावर पांगरी हे गाव आहे. आता जिंतूर – परभणी रोडवर कुठेही एक झाड शिल्लक राहील नसताना हे वडाचे झाड दिमाखात डोलत होते. पण त्याला हे माहीत नव्हते की लवकरच त्याला कुर्‍हाडी लागणार आहेत.

परंतु ज्या गावातील लोकांना ह्या वडाने शंभर वर्ष सावली दिली होती त्याच्या संघर्षाला गावकर्‍यांनी स्वतःचा संघर्ष मानलं, गावातल्या शाळकरी मुलांनी त्याला आलिंगन देऊन आंदोलन केलं, तरुणांनी वृत्तपत्रे, समाज माध्यमातून विरोध केला तर मोठ्या माणसांनी शासकीय स्तरावर प्रयत्न केले. पण झाड तर रस्त्याच्या आड येतच होते. शेवटी गावकऱ्यांचा विरोध आणि त्यांची चिकाटी पाहून एक मध्यम मार्ग निवडला गेला. झाडाच्या ज्या फांद्या आड येऊ लागल्या त्या तोडून उर्वरित झाड राहू देण्याचा निर्णय घेण्यात आला. झाड वाचेल.

जेव्हा झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या तेंव्हा गावातील तरुणांनी त्याच्य रस्त्याच्या नवीन अंतरानुसार दुतर्फा तोडलेल्या फांद्या लावल्या. अर्ध्या झाडाच्या बदल्यात नवीन 16 झाडे लावण्यात आली. शेवटी पांगरी गावची वडाची पांगरी ही ओळख तर जपली गेलीच शिवाय आत्ता लावलेली झाडे जेव्हा मोठी होतील तेव्हा ही ओळख अधिक प्रखर होईल. एखाद झाड गावाची ओळख होते तेव्हा निसर्गाला किती हायसे वाटत असेल.

या महामार्ग निर्मितीच्या वेळी असे कितीतरी झाडे असतिल जे वाचू शकले असते किंवा पांगरीच्या झाडा सारखे अर्धे राहिले असते. त्याचे पुनर्वसन तर नक्कीच करता आले असते. पण तसे झाल्याचे दिसून येत नाही. ही शासनाची जेवढी उदासीनता आहे तेवढीच बेफिकीरी नागरिकाची सुद्धा आहे.

आज सगळीकडेच जल आणि वृक्ष संवर्धनाची चळवळ सुरू असताना शासकीय स्तरावर फक्त नावालाच काम केले जात आहे. पर्यावरणीय कायदे उद्योग / इंडस्ट्री साठी गुंडाळून ठेवले जात आहेत. निसर्ग/जल संवर्धनासाठी काम करणाऱ्या NGO वर दाबाव आणल्या जात आहे. खरतर निसर्गाशिवाय माणूस जगू शकत नाही हे सर्वांना माहीत असताना सुद्धा निसर्ग विरोधी वर्तन का असते हे याचे कारण मानवाच्या स्वार्थी वर्तणुकीत आहे.

याच माणसाने अधिक स्वार्थी होऊन , भविष्याचा विचार करून निसर्ग संवर्धन करावे. झाडाशीवाय माणसाची काहीच ओळख नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.