मांजरी : विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज दुपारी येथील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या आग लागलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर जावून पाहाणी केली. सव्वा बारा ते सव्वा एक असा एक तास त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी त्यांनी कोरोना लसीचे काम सुरक्षित असून काल घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे, असे गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की सिरमने अंतर्गत फायर ऑडिट केले आहे. आग लागल्यानंतर सेन्सर सुरू झाले होते. मात्र आग मोठी होती. दुर्दैव असे की त्यात काही व्यक्ती या मृत झाल्या आहेत. दुर्घटनेत मृत झालेल्या कामगारांना सिरम इन्स्टिट्युट ने 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
सरकार काही मदत करणार याविषयी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की मुळातच असंघटित कामगार आणि त्याचे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. केंद्राने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या असंघटित कामगारांची काळजी घेणे खरेतर संबधीत ठेकेदारांची जबादारी असते.
धनंजय मुंढे आणि रेणू शर्मा या प्रकरणावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, या प्रकरणात या महिलेने का माघारी घेतली किंवा कोणत्या उद्देशाने असे आरोप केले हे माहीत नाही, परंतु पोलीस तपास व न्यायालयीन गोष्टीतून सर्व कळू शकते. तरीही महिलेने खोटे आरोप केले असतील तसे उघड झाल्यास न्यायालीन परवानगी योग्य ती कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील.