लसीकरणाचे नियोजन; “कोवॅक्सीन’ की “कोविशील्ड’ संभ्रम दूर करण्याचा महापालिकेचा प्रयत्न
पुणे – ‘कोवॅक्सीन’ की “कोविशील्ड’ असा सुरू असलेला संभ्रम दूर करण्याचा महापालिकेने प्रयत्न केला असून बुधवारपासून महापालिकेच्या 11 प्रसुतीगृहांमध्ये “कोवॅक्सीन’ शिवाय “कोविशील्ड’ चा फक्त दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. तर महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये पहिला “कोवॅक्सीन’चाच डोस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
राज्य सरकारने पुणे महापालिकेला “कोवॅक्सीन’चा मोठा साठा दिल्यामुळे आणि “कोविशील्ड’ कमी दिल्यामुळे सर्व रुग्णालयांमध्ये “कोवॅक्सीन’चेच लसीकरण सुरू झाले आहे. मात्र ज्यांचा दुसरा “कोविशील्ड’चा डोस आहे, त्यांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो सोडवण्यासाठी महापालिकेने 11 मोठ्या प्रसुतिगृहांमध्ये त्या लाभार्थ्यांची सोय केली आहे.
राज्याकडून महापालिकेला रविवारी 50 हजार “कोवॅक्सीन’ लस उपलब्ध झाली परंतु “कोविशील्ड’ची लस मिळाली नाही. त्यामुळे महापालिकेने सोमवारी आहे त्या शिल्लक साठ्याच्या आधारे लसीकरण केले. मंगळवारपासून महापालिकेने सर्वच केंद्रांवर “कोवॅक्सीन’ देण्याचा निर्णय घेतला.
मात्र, पहिला डोस ज्या लाभार्थ्यांचा होता त्यांना ते घेणे शक्य झाले परंतु ज्यांचा दुसरा डोस होता त्यांना “कोविशील्ड’च घेणे क्रमप्राप्त होते. त्यांच्या डोसचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला, त्यातून संभ्रम निर्माण झाला आणि अनेक लाभार्थ्यांना डोस न घेताच परत जावे लागले.
याशिवाय महापालिकेच्या सगळ्याच केंद्रांवर दोन्ही लस देणे शक्य नाही. त्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. म्हणून या 11 केंद्रांचा सुवर्णमध्य महापालिकेने काढला असून, या केंद्रांवर दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उसने घेतलेले परत…
महापालिकेला “कोविशील्ड’चे 20 हजार डोस मिळाले. त्यातील 15 हजार लस पिंपरी-चिंचवडला परत दिले जाणार आहेत, जी त्यांच्याकडून उसने घेतली होती. पाच हजार लस महापालिकेच्या केंद्रांमध्येच दुसऱ्या डोस साठी वापरण्यात येणार आहे. याशिवाय 25 हजार लस “कोवॅक्सीन’ कंपनीची महापालिकेला मिळाली आहे.
“कोविशील्ड’चा अपुरा पुरवठा आणि अनुपलब्धता लक्षात घेता सरकारी सोडून सर्व खासगी रुग्णालयांनी “कोवॅक्सीन’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्व खासगी रुग्णालयांमध्ये आता पहिला डोसच उपलब्ध होणार आहे.
– डॉ. मनिषा नाईक, सहाय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका