नवी दिल्ली, दि. 4- दोन भारतात तयार करण्यात आलेल्या लसी, रशियाची स्पुटनिक याच्याव्यतिरिक्त आता फायझर आणि मॉडर्नाच्या परदेशात तयार करण्यात आलेल्या लसीही येत्या काही महिन्यांत भारतात उपलब्ध होणार आहेत.
फायझरच्या लसीला लवकर परवानगी मिळावी यासाठी आम्ही भारत सरकारशी बोलणी करत असल्याचे या कंपनीने सोमवारी सांगितले. तर कमी उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी आम्ही साडेतीन कोटी डोस देणार असल्याचे मॉडर्नाने म्हटले असून त्यात भारत आणि ब्राझील या देशांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मे ते जुलै या काळासाठी 16 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची ऑर्डर आमी सीरम आणि भारत बायोटेकला दिली असल्याचे सरकारने सोमवारी सांगितले. यातील 11 कोटी लसी कोविशिल्डच्या असणार आहेत. त्या येत्या काही महिन्यांत दिल्या जाणार असल्याचे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.