‘आयसेरा बायोलॉजिकल’ बनविणार करोनावरील लस

संचालक देशमुख व कुलकर्णी यांची माहिती; केंद्राचा हिरवा कंदील

– सुभाष कदम

शिराळा – संपूर्ण जगासमोर आव्हान असलेल्या करोनाच्या बंदोबस्तासाठी मराठी माणूस पुढे सरसावला आहे. शिराळा येथील “आयसेरा बायोलॉजिकल’ या कंपनीच्या शास्त्रज्ञांनी करोनावर लस शोधण्याचे आव्हान स्वीकारले आहे. लस निर्मिती आणि चाचण्यांसाठी या कंपनीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. करोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्यास अपवादात्मक परिस्थितीत नियमांच्या अधीन राहून सात ते आठ महिन्यांमध्ये लस तयार करता येईल, असा विश्‍वास कंपनीचे संचालक प्रताप देशमुख व दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

करोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शेकडो कंपन्या व प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञ जीवाचे रान करत आहेत. मानवजातीच्या अस्तित्वालाच आव्हान देणाऱ्या करोनावर मात करण्यासाठी शिराळ्याची आयसेरा बायोलॉजिकल कंपनीही सरसावली आहे. या कंपनीत घटसर्प, सर्पदंश, रेबीजसारख्या आजारांवर प्रतिजैविके बनविली जातात.

गेल्या काही दिवसांत करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण रोखण्यात प्रतिजैविकाच्या वापराने चीनला यश आले आहे. त्याचाच वापर आयसेरामध्ये केला जाईल. प्रतिजैविकांमुळे विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. बालकांमधील घटसर्प या आजारावर हे तंत्र खूपच परिणामकारक सिद्ध झाले आहे. कावीळ, गोवर, रेबीज व अन्नातून होणाऱ्या विषबाधेवरही प्रतिजैविकांचा फायदा झाला आहे. इबोलावरल इलाजातही प्रतिजैविकांनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती.

आयसेराचे संचालक देशमुख व कुलकर्णी यांनी दावा केला आहे की, करोनावर भारतीय तंत्रज्ञानाने बनविलेली प्रतिजैविके अत्यंत कमी वेळेत परिणामकारक ठरतील. वयस्कर व कमी प्रतिकारक्षमता असलेल्या रुग्णांनाही ती जीवदायी ठरतील. प्रचलित औषधांना प्रतिसाद न देणारे रुग्णही या औषधाने सहज बरे होऊ शकतील. आयसेरा कंपनीने केंद्र सरकारकडे लस निर्मिती व चाचणीची परवानगी मागितली होती. कंपनीच्या प्रस्तावाचे विश्‍लेषण करून परवानगी देण्यात आली आहे. या लसीची क्‍लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर उत्पादन करता येईल.

पूर्णपणे भारतीय बनावटीची लस
या क्षेत्रात संशोधनाचा 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या दिलीप कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील आयसेराच्या शास्त्रज्ञांचा चमू लस निर्मितीचे आव्हान स्वीकारायला सज्ज झाला आहे. कोरोनाविरोधातील या लढाईतही यशस्वी ठरू, असा विश्‍वास देशमुख व कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.