सीरम, भारत बायोटेकचे तुझ्या गळा माझ्या गळा

पुणे – आमची लस गुणवत्ता पूर्ण, बाकीच्या लस पाण्यासारख्या उपयुक्‍त, हे सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांचे वाक्‍य आणि एक आठवडा द्या आमच्या लसीची गुणवत्ता सिद्ध करतो, हे भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा इल्ला यांनी दिलेले आव्हान. जगात नावलौकिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांध्ये निर्माण झालेल्या शाब्दिक युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही संस्थांनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन “तुझ्या गळा माझ्या गळाचे सूर’ आळवले.

“सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ आणि “भारत बायोटेक’ यांच्यात निर्माण झालेल्या समज-गैरसमजांमुळे आणि शाब्दिक चकमकीमुळे लसीकरण मोहीम अडचणीत येते की काय, अशी भीती वाटावी असे वाटत असतानाच दोन्ही कंपन्यांच्या वरील प्रमुखांनी लस उत्पादन आणि पुरवठ्याबाबत सामंजस्याची भूमिका घेत एकत्रित, सहमतीने पुढे जाणार असल्याचे संयुक्‍त निवेदन मंगळवारी प्रसिद्ध केले.

करोना संपुष्टात आणण्यासाठी लस शोधणे, त्याचे उत्पादन आणि वितरण भारत, आणि जगासाठी करणे हा आमचा समान उद्देश आहे. भारत आणि जगातील माणसांचे प्राण वाचवणे आणि त्यांचे जीवंतपण परत करणे, हे आमच्यासाठी मोठे आव्हान आहे. लस ही सार्वजनिक आरोग्यासाठी उत्तम आहे. त्याचा उद्देश जीव वाचवण्याची क्षमता आहे. यासिवाय लस आर्थिक सुरळीतपणा लवकरात लवकर आणू शकते, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात सध्या दोन लसींना आपत्कालीन वापराचा परवाना मिळाला आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दर्जेदार, सुरक्षित आणि परिणामकारक लस देण्यासाठी उत्पादन, पुरवठा आणि वितरण यावरच दोन्ही कंपन्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. हे देश आणि जगाप्रती आमचे कर्तव्य आहे. या दोन्ही कंपन्या आपल्या लसीच्या विकासासाठी कार्यरत आहेत, असे त्यात स्पष्ट केल आहे.

गेल्या काही आठवड्यात निर्माण झालेले गैरसमज आणि विसंवाद दूर करत दोन्ही कंपन्या एकमेकांच्या कार्याबाबत आदर बाळगत आहेत. आम्हाला लसीचे महत्त्व माहीत असून आम्हा दोघांनाही जगाला ही लस पुरवण्यात आनंद आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.