दिनविशेष : लस आणि लसीकरण

प्राचार्य नरहरी पाटील 

पृथ्वीवर जीवउत्पत्तीपासून अनेक साथीचे आजार आले. त्यावर योग्य लस निर्माण करून या साथ आजारांना आळा घालण्यात आला. सध्या करोना महामारीवर लस शोधण्यात आली आहे. आज जागतिक आरोग्य दिन. त्यामुळे लसीकरण इतिहासाचा आढावा…

प्राचीन काळाचा विचार केला तर त्याकाळी संपूर्ण जग देवी किंवा तत्सम संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असल्याचे दिसून येते. भारत आणि इजिप्त सारख्या देशांमध्ये अशा काही आजारांवर लसीकरणासारखी उपचार पद्धती वापरली जात होती असे म्हटले जाते. कांग नावाच्या चीनमधील एका सम्राटाने 16व्या शतकात लसीकरणासारखा काहीसा प्रकार केल्याची नोंद आहे.

लेडी मॉन्टेग्यु यांनी खऱ्या अर्थाने देवी या आजारावर प्रथम लसीकरणाचा पहिला ज्ञात प्रयोग तुर्कीमध्ये 1718 मध्ये केला आणि त्यानंतर असाच प्रयोग इंग्लंडमध्ये 1721 मध्ये केला. या दोन्ही वेळा त्यांना देवी या रोगाची प्रतिकार शक्‍ती त्या व्यक्‍तीमध्ये निर्माण झाल्याचे आढळले. बेंजामिन जेसले यांनी असाच प्रयोग 1774 मध्ये स्वतःच्या मुलावर आणि पत्नीवर केला. त्यांनाही त्या व्यक्‍तीमध्ये देवी या रोगाची प्रतिकार शक्‍ती निर्माण झाल्याचे आढळून आले. या पद्धतीमध्ये एका रोग झालेल्या शरीराच्या भागातील द्रव्य दुसऱ्या व्यक्‍तीच्या त्वचेवर लावले जाई. अशा प्रकारे औषध देण्याच्या पद्धतीस त्यावेळी इनॉक्‍युलेशन किंवा वेरीओला आजारामुळे व्हेरीओलशान असे संबोधले जाई.

1796 मध्ये डॉ. एडवर्ड जेन्नर यांनी असाच प्रयोग काही व्यक्‍तींवर केला. देवी या आजारासारखेच काही आजार गायींना होतात. अशा गायींच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तीलाही ते आजार झाल्याचे डॉ. जेन्नर यांनी पाहिले. त्यानंतर त्या व्यक्‍तीला देवी आजार होत नाही हे त्यांच्या लक्षात आले. डॉ. जेन्नर यांना शरीरात असलेल्या रोगकारक घटकातील साधर्म्य व आजार न होणे यातील संबंध लक्षात आला. डॉ. जेन्नर यांनी एका गायीचा आजार झालेल्या रुग्णाच्या त्या आजार झालेल्या भागातील द्रव्य घेऊन ते दुसऱ्या व्यक्‍तीच्या शरीरात टोचले. 

या दुसऱ्या व्यक्‍तीला देवी आजाराचा संसर्ग झाला नाही. असाच प्रयोग त्यांनी अनेक लोकांवर केला. त्यानंतर त्यांनी एखादा साम्य असणारा रोगकारक घटक रुग्णास दिल्यास त्या रुग्णामध्ये त्या आजाराचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे असे घटक मिळवण्याचा आणि ते इतरांना देऊन त्यांची रोगप्रतिकारक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला. 1803 मध्ये डॉ. जेन्नर यांनी या जैविक घटकास “व्हॅक्‍सिन’ असे नाव दिले. हे नाव लॅटिन भाषेतील वेका या शब्दावरून आले असून वेका याचा अर्थ लॅटिन भाषेत गाय असा आहे. कारण हा जैविक घटक जेन्नर यांनी गायीपासून मिळविला होता.

डॉ. जीन केरो यांनी प्रथमच भारतात लसीकरण आणले. त्यावेळी लसीकरणासोबत इनॉक्‍युलेशन किंवा इतरही प्रकारे औषध देण्याची पद्धत उपयोगात होती. त्यावर लसीकरण आल्यानंतर बंदी घालण्यात आली. भारतात मुंबई येथे 14 जून 1802 रोजी अण्णा दुस्थल या बालकास लसीचा पहिला डोस देण्यात आला. 1817 मध्ये जग कॉलराच्या साथीने ग्रासले. त्याचबरोबर जगात फ्रान्ससह अनेक ठिकाणी टायफॉइडची साथ सुरू झाली. लुई पाश्‍चर या फ्रेंच शास्त्रज्ञाने यावर लस शोधली.

1890 मध्ये भारतात इंग्रज सरकारने लसीकरणाचा कायदा केला. आजच्या कोविड काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याची बीजे या कायद्यामध्ये असल्याचे सांगितले जाते. याच काळात मद्रास येथे लसीच्या संशोधनास सुरुवात झाली. येथे प्राण्यांवर प्रयोग सुरू करण्यात आले. 1893 हे साल भारतीय लस निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. डॉ. वॉलडमार हाफकिन यांनी भारतात कॉलरा लसीकरण चाचण्या आग्रा येथे सुरू केल्या. 1895 मध्ये प्रथमच घोड्यांचा वापर लस निर्मितीसाठी करण्यात आला.

1896 मध्ये भारतात प्लेगची साथ सुरू झाली. डॉ. हाफकिन यांनी 1897 मध्ये प्लेगची लस शोधून काढली. डॉ. हाफकिन यांनी कॉलरा लसीसंदर्भात संशोधन करून अजून परिणामकारक लस निर्माण केली. 1914 पासून जगभरात इन्फ्लुएंझा या आजाराने थैमान घातले. 1921 साली काल्मेट आणि गुइरिन यांनी क्षय या आजारावर लस निर्माण केली. यास बीसीजी असे नाव देण्यात आले. दरम्यानच्या काळात पोलिओ, रुबेला, कांजण्या, काविळ, गलगंड, गोवर रॅबिज, मेंदूज्वर, धनुर्वात, घटसर्प असे विविध संसर्गजन्य आजार आढळून आले. देवी, पोलिओ अशा आजारांचा जगातून बिमोड झाला असून काविळ, रोटा, इबोला, झिका, सार्स अशा आजारांवर लस निर्मिती होत आहे.

आज करोना महामारीवर लस निर्मिती जागतिक पातळीवर विक्रमी वेळेत करण्यात आली. अमेरिकेतील फायझर, मॉडर्ना, रशियातील स्पुटनिक या लसीसोबतच भारतातील सीरम कंपनीने कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्‍सीन लस आज वापरात आहे. लवकरच झायडस आणि डॉ. रेड्डीची लसही वापरात येईल. लस संकल्पनेचे जनक डॉ. एडवर्ड जेन्नर, लुई पाश्‍चर, बेंजामिन जेसले, डॉ. हाफकिन यांचे आपण कायम ऋणी राहिले पाहिजे कारण उत्क्रांतीच्या घटनांमध्ये मानवाचे अस्तित्व लस निर्मिती अभावी या उपद्‌व्यापी जीवजंतूंनी धोक्‍यात आणले असते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.