पुणे -जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून लसींचा पुरवठा वाढल्याने महापालिकेने अवघ्या 9 दिवसांत 1 लाख लसींचे डोस दिले आहेत. त्यात दुसऱ्या डोस घेणाऱ्या व्यक्तींसह, 45 वर्षांवरील नागरिकांना तसेच 18 वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या डोसचाही समावेश आहे.
शहरात 16 मार्चपासून करोना लसीकरण सुरू झाले.
त्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, नंतर फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर 1 मार्चपासून 65 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे शहरात लसीकरणाचे 1 लाख डोस होण्याचा कालावधी 16 मार्च ते 9 मार्च 2021 होता.
त्यानंतर लसींचा पुरवठा वाढत गेला, तसे लसीकरण वेगही वाढला. मार्चमध्ये लसींचा शहरात मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने तसेच फ्रंटलाइन वर्करसाठी लस उपलब्ध झाले. त्यानंतर 18 मार्च रोजी शहरात 2 लाख डोस लसीकरण झाले. त्यानंतर लस पुरवठ्यात अडथळे येत असल्याने नागरिकांचा दुसरा डोस तसेच नवीन नागरिकांचे लसीकरण यासाठी महापालिकेस मोठी कसरत करावी लागली.
त्यामुळे पालिकेचा 5 लाख लसीकरणाचा टप्पा 7 एप्रिल, तर 10 लाख लसीकरणाचा टप्पा 28 मे रोजी गाठला. यानंतर अवघ्या तीनच आठवड्यांत महापालिकेने 15 लाख लसीकरणाचा टप्पा 23 जून रोजी गाठला आहे. सध्या शहरात दररोज शासकीय तसेच खासगी हॉस्पिटल आणि कामाच्या ठिकाणी एकूण 296 लसीकरण केंद्र आहेत. शहरात सरासरी शासकीय आणि खासगी हॉस्पिटलचे दिवसाला 25 ते 27 हजार जणांचे लसीकरण होत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.