पुणे जिल्हा: सप्टेंबर महिन्यात लसीकरणाचा उच्चांक?

पुणे जिल्हा एक कोटीचा टप्पा पार करणार

सागर येवले
पुणे – मोठ्या प्रमाणात होत असलेला लसींचा पुरवठा आणि सामाजिक संस्था, कंपन्यांकडून संयुक्‍तपणे राबविण्यात येणाऱ्या “महालसीकरणा’मुळे सप्टेंबरमध्ये लसीकरण उच्चांक गाठणार आहे.कारण, अवघ्या पंधरा दिवसांत पुणे जिल्ह्यात 11 लाख लसीकरण झाले असून, लसीकरणाचा हाच वेग राहिला, तर सप्टेंबर अखेरपर्यंत 20 ते 21 लाखांहून अधिक लसीकरण होईल.

दरम्यान, जिल्ह्याने आज लसीकरणामध्ये तब्बल 99 लाखांचा टप्पा पार केला असून, पुढील 24 तासांत 1 कोटी लसीकरण पूर्ण होईल. पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतचा लसीकरणाचा उच्चांक हा ऑगस्ट 2021 मध्ये 18 लाख 80 हजार इतका आहे.

जून महिन्यापासून लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे मागील साडेतीन महिन्यांत तब्बल 63 लाख लाभर्थींचे लसीकरण झाले. म्हणजे एकूण लसीकरणामधील 70 टक्‍के लसीकरण या साडेतीन महिन्यांत झाले. 16 जानेवारी 2021 मध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्यात डॉक्‍टर आणि नर्स यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स आणि टप्याटप्याने 60 वर्षांपुढील, 45 वर्षांपुढील तर आता 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण सुरू झाले.

जानेवारी ते मार्च 2021 या अडीच महिन्यांत 8 लाख 84 हजार लभार्थ्यांचे लसीकरण झाले. मे महिन्यात 5 लाख 43 हजार लसीकरण झाले. लाभार्थ्यांची वाढती संख्या आणि लसीचा अपुरा पुरवठा यामुळे लसीकरण कमी होत होते. मात्र, जूननंतर लसीचा पुरवठा हळूहळू सुरळीत झाल्यामुळे लसीकरणाला गती मिळाली.

ऑगस्ट महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 18 लाख 80 हजार लाभार्थींचे लसीकरण झाले. तर, सप्टेंबरच्या 1 ते 15 तारखेपर्यंत 11 लाख 20 हजार लसीकरण झाले आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत दुप्पट म्हटले तरी 22 लाख लसीकरण होईल.

तब्बल 5 वेळा एक लाखांपेक्षा…
अपुरा लसपुरवठामुळे पुणे जिल्ह्यात दैनंदिन 30 ते 60 हजार लसीकरण होत होते. मात्र, सप्टेंबरमध्ये लसीचा मोठ्या प्रमाणात आलेला साठा आणि विविध कंपन्यांकडून राबविण्यात आलेल्या लसीकरणामुळे मागील पंधरा दिवसांत तब्बल 5 वेळा जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाले. तर, एका दिवशी तब्बल पावणेतीन लाख लसीकरणाचा टप्पा पार करत उच्चांक गाठलेला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.