- आठ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था
- 17 हजार 800 जणांची नोंदणी
पिंपरी- शहरामध्ये शनिवारी (दि. 16) डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आदी करोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. महापालिकेच्या वतीने त्यासाठी 8 केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली होती. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 456 जणांना लस देण्यात आली.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, “ग’ प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक संदीप वाघेरे, शैलेश मोरे, नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, अर्चना बारणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरूमणी डॉ. बाळासाहेब होडगर आदी उपस्थित होते.
जिजामाता रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ फुग्यांची आकर्षक सजावट केली होती. तसेच, करोना लसीकरणाचा संदेश देणारी लक्षवेधक रांगोळी काढली होती. लसीकरणासाठी महापालिकेच्या वतीने यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय, ईएसआय रुग्णालय आदी ठिकाणी व्यवस्था केली होती.
करोना लसीकरणासाठी डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 17 हजार 800 जणांनी नोंदणी केली आहे. प्रत्यक्षात 15 हजार लस आतापर्यंत उपलब्ध झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी 2 जानेवारीला करोना लसीकरणाची ड्राय-रन (रंगीत तालीम) झाली होती. त्यानंतर 14 दिवसांनी आज प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पडताळणी कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष अशी सोय केली होती. प्रथम लस घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची यादीनुसार तपासणी केली जात होती. त्यानंतर त्यांना लसीकरणासाठी पाठविण्यात येत होते. लस टोचल्यानंतर त्रास झाल्यास करावयाच्या उपाययोजना, लसीच्या चार आठवड्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या डोसची तारीख लाभार्थ्यांना देण्यात येत होती. लस दिल्यानंतर अर्ध्या तासासाठी त्यांना निरीक्षण कक्षात निरीक्षणाखाली थांबविण्यात येत होते. त्यानंतरच घरी सोडले जात होते.
लसीकरणाबाबत एसएमएसद्वारे कळविणार
दिवसभरामध्ये एका केंद्रावर 100 याप्रमाणे 8 केंद्रांवर एकूण 800 जणांना लस देण्याचे नियोजन केले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 456 जणांना लसीकरण करण्यात आले. तसेच चार आठवड्यानंतर या लसीचा दुसरा डोस लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. कोवीन ऍपद्वारे लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे संदेश पाठविला जाणार आहे. या संदेशामध्ये लसीकरण दिनांक, वेळ व स्थळ याचा उल्लेख असेल.
उद्योगनगरीतील करोना लसीचे पहिले मानकरी – डॉ. पवन साळवे
उद्योगनगरीतील करोना लसीचा शुभारंभ अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना करोनाची लस देऊन करण्यात आला.त्यानंतर लसीकरणाला सुरुवात झाली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत “सेल्फी’ घेऊन हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात टिपला.
शहरामध्ये पहिल्या टप्प्यात आज आठ ठिकाणी करोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविडमुक्त पिंपरी-चिंचवड शहर करण्याच्या लढ्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये 17 हजारांपेक्षा अधिक आरोग्य सेवा देणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलीस, स्वच्छता कर्मचारी, होमगार्ड आदी करोना योद्ध्यांना लसीकरण केले जाईल.
– श्रावण हर्डीकर, आयुक्तकरोना लसीकरणासाठी शहरातील सर्व 8 केंद्रांवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुरेशी दक्षता आणि काळजी घेण्यात आली. लसीकरणानंतर काही जणांना किरकोळ स्वरूपाचा त्रास जाणवला. लसीकरणासाठी आज प्रत्येक केंद्रनिहाय 100 जणांची यादी तयार केली होती. त्यानुसार लसीकरण केले.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी.