सातारा – सातारा जिल्ह्यात येत्या काही दिवसात सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामास प्रारंभ होत आहे. लंपी त्वचा रोगाच्या पार्श्वभूमीवर या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने परजिल्ह्यातील जनावरांना जिल्ह्यात आणताना लसीकरण सक्तीचे केले आहे. लसीकरण न करता व बाधित जनावरे आढळल्यास त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने उपचार करण्यात येणार आहेत.
जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट २०२३ मध्ये लंपी त्वचा रोगाने शिरकाव केला होता. त्याचा प्रसार राज्यभर झाल्याने मोठ्या प्रमाणात जनावरांना लंपी त्वचा रोगाची बाधा झाली होती. या आजाराचा दिवसेंदिवस फैलाव वाढू लागल्याने अनेक जनावरेही मृत्यूमुखी पडली. त्यानंतर जिल्हा परिषदेसह राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला . पशुसंवर्धन विभागाने युध्दपातळीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिम राबवल्याने लंपी त्वचारोगाला आळा घालण्यात काही प्रमाणात यश आले होते.
सातारा जिल्ह्यात मागील २ ते ३ महिन्यांपासून लंपी त्वचारोगाचा फैलावा वाढू लागला असून त्यातच आता ऊस तोडीचा हंगाम सरू होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यावर परजिल्ह्यातून बैलजौड्या दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. ऊसतोड कामगारांच्या बैलजोड्या मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. परजिल्ह्यातून येणाऱ्या जनावरामुळे लंपी त्वचारोगाचा आजार फैलावण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. पशुसंवर्धन विभाग साखर कारखान्यांच्या हद्दीत जावून बैलाची तपासणी करणार आहे. परजिल्ह्यातील गोवर्धनीय जनावरांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. अन्य ठिकाणाहून येणाऱ्या ऊसतोड कामगारांनीही बैलाचे लसीकरण करणे आवश्यक आहे, तशा सूचना कारखाना व्यवस्थापनालाही देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात जनावरांना लंपी त्वचारोगाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने विविध उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात १५ नोेव्हेंबरपासून साखर कारखान्यांचा ऊस तोड हंगाम सुरू होत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलजोड्यांची तपासणी सुरू केली आहे. याचबरोबर कारखानास्थळावर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जनावरांची तपासणी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू असून काही कारखानास्थळावर जनावरे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. परजिल्ह्यातून कामगारांनी येतानाच बैलजोड्यांचे लसीकरण करून येणे अपेक्षित आहे. याचबरोबर लसीकरण न झालेल्या जनावरांचे लसीकरण करून तपासणी केली जाणार आहे. लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
-डॉ. विनोद पवार (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी)