पुणे -गोवर या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी राज्यात दोन टप्यामध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय टास्क फोर्सने घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदा, आरोग्य विभाग यांना सूचना देण्यात आल्या आहे. त्यामध्ये दि.15 ते 25 डिसेंबरमध्ये पहिला टप्पा पार पडेल. तर दुसरा टप्पा दि.15 जानेवारी ते 25 जानेवारी असा असेल.
गोवर आजाराबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्य टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये टास्क फोर्सने केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गोवर रुबेलासाठी विशेष लसीकरण अभियान राबविण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. ऑनलाइन कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आयुक्त मनपा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि आरोग्य खात्यातील सर्व राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या अभियानात गोवर रुबेलाचा एकादाही डोस चुकलेल्या 9 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील सर्व बालकांना चार आठवड्यांच्या अंतराने गोवर रुबेलाचे दोन डोस देण्यात येतील. त्यासाठी सर्व जिल्हे आणि मनपा यांनी स्थानिक पातळीवर लाभार्थी यादी तयार करणे, अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन आवश्यक असून, मनुष्यबळ उपलब्ध केले
जाणार आहे.
घरोघरी सर्वेक्षण
गोवर प्रभावित भागात 1 हजार 237 पथकांमार्फत आतापर्यंत 14 लाख 83 हजार 528 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 36 हजार 399 बालकांना व्हिटॅमिन ए ची मात्रा देण्यात आली तर 15 हजार 490 बालकांना गोवर रुबेला पहिला डोस आणि 9,277 बालकांना गोवर रुबेला दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणामुळे गोवर आजार टाळता येऊ शकतो.