11 एप्रिलपासून कार्यालयातच लसीकरण; अशी असेल मोहीम…

केंद्र सरकारचा नवा फंडा

नवी दिल्ली – खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयात कार्यरत 45 वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांना 11 एप्रिलपासून लसीकरण सुरू करण्याचे आदेश केंद्र सरकारने बुधवारी जारी केला. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र लिहले आहे. त्यात ते म्हणातात, 45 वर्ष आणि त्यावरील व्यक्ती मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेच्या संघटित क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सरकारी किंवा कार्यालयात रितसर काम करतात. ते सेवा किंवा उत्पादन क्षेत्रातही कार्यरत असतात.

लसीकरणाची मोहीम आधिक अर्थपूर्ण आणि व्यावहारिक करण्यासाठी करोना लसीकरण कार्यस्थळावर 100 पेक्षा अधिक इच्छूक लाभ धारक असल्यास आयोजित करावे. त्या कार्यस्थळांना सध्याच्या लसीकरण केंद्राशी जोडण्यात यावे, असे या पत्रात बजावण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राज्य आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांच्यासाठी आचार संहिता बनवण्यात येणार आहे.

कार्यस्थळावर लसीकरणासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील मालक अणि व्यवस्थापनाशी चर्चा सुरू करावी. त्याद्वारे त्यांना कार्यस्थळावर लसीकरणसाठी तयार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ कर्मचाऱ्यांनाच या लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे, अगदी त्यांच्या कुटुंबियांनाही त्यात सहभाग करून घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व वयोगटांसाठी लसीकरण खुले करण्याची मागणी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारचा हा अध्यादेश निघाला आहे. अनेक ठिकाणी लस वाया जात असून त्यावरही विविध वर्गातून टीकेची झोड उठत आहे, त्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या या निर्णयाला महत्व आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.