हिंजवडी – माण प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम 8 मार्चपासून सुरू करण्यात आली. मात्र नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेल्या संभ्रमावस्थेमुळे व लसीच्या तुटवड्यामुळे महिनाभरात केवळ 3 हजार 469 लोकांना लस देण्यात आली.
माण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या 22 गावांसाठी माण घोटवडे व नेरे या तीन ठिकाणी करोनाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला आरोग्य, शासकीय कर्मचारी तसेच पोलीस व 60 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली.
तर गेल्या 2 दिवसांपासून 45 वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण सुरू केले आहे. माण आरोग्य केंद्रात मंगळवारी केवळ 200 नागरिकांना लस देण्यात आली. मात्र, दुपारीच लस संपल्यामुळे लसीकरणास आलेल्या तासन्तास ताटकळत बसावे लागले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.
आरोग्य कर्मचारी वाढवा
माण प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीच्या पुरवठ्यासोबत आरोग्य कर्मचाऱ्यांचाही तुटवडा असल्याचे ग्रामपंचायत सदस्या रुपाली बोडके यांच्या निदर्शनास आले. त्या म्हणाल्या, “राज्यभर नावाजलेल्या या आरोग्य केंद्रात डॉक्टर्स नर्सेस व आरोग्य कर्मचारी ज्या पटीत पाहिजेत तेवढी संख्या उपलब्ध नसल्याने येथील रुग्णसंख्या व दैनंदिन ओपीडी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ आरोग्य सेवक वाढविले पाहिजे.’
तीन ठिकाणी लसीकरण सुरू केल्याने काही आरोग्य कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त केले आहेत. मुळशीसाठी पुरेशा लस मिळत आहेत. मात्र, काही केंद्रावर दोन-दोन दिवस लस शिल्लक राहत असल्याने ती अन्य केंद्रांवर पाठवण्यात येत आहे. लसीकरणाबाबत मुळशी तालुका आघाडीवर आहे. अपेक्षेप्रमाणे चांगली टक्केवारीमध्ये लसीकरण होत आहे; मात्र पुरेशी माहिती नसल्याने स्थानिक नागरिक लसीकरणाला येत नाहीत.
– डॉ. अजित कारंजकर, तालुका आरोग्य अधिकारी, मुळशी