पालिका हद्दीतील शाळांना वर्षभरात 128 दिवस सुट्ट्या

सण व उत्सवासाठीच्या 31 दिवस सुट्ट्या असणार


14, 15 जानेवारीला शाळा असणार बंद

पुणे – पुणे महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांना सन 2020 या वर्षात तब्बल 128 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. यात सण व उत्सवासाठीच्या 31 दिवस सुट्ट्या असणार आहेत.

महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी मिनाक्षी राऊत यांनी सोमवारी (दि. 13) शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्याबाबतचे परिपत्रकही शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहे. वर्षभरात 238 दिवस शाळांचे कामकाज चालणार आहे. उर्वरित दिवसांमध्ये शाळांना सुट्टी असणार आहे. यात उन्हाळी सुट्ट्या 32 दिवस, दिवाळी सुट्ट्या 12 दिवस, सर्वसाधारण सुट्ट्या 31 दिवस, एकूण रविवार 52 दिवस, स्थानिक सुट्टी 1 दिवस याप्रमाणे सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मराठी शाळांप्रमाणेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी या सुट्ट्या लागू राहणार आहेत. खासगी शाळांनी यादीतील सुट्ट्यांव्यतिरिक्‍त इतर सुट्ट्यांचे नियोजन करावयाचे असल्यास संबंधित विभागाचे पर्यवेक्षक व सहायक प्रशासकीय अधिकारी यांच्या शिफारशीसह प्रस्ताव मान्यतेसाठी महापालिका कार्यालयात पाठविणे बंधनकारक आहे. परवानगी न घेता अन्य दिवशी सुट्टी घेतल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरण्यात येणार असून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही प्रस्तावित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सुट्ट्यांमधील कामांचे तास भरून काढावे लागणार
थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी शालेय वेळेत कार्यक्रमाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना त्या दिवसाचे महत्त्व पटवून द्यावे लागणार असून संबंधित कार्यक्रमाचा अहवाल विभागीय पातळीवर सादर करावा लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा गांधी जयंतीनिमित्त शालेय वेळेत बालसभा घ्याव्या लागणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्यांमधील कामाचे तास भरून काढावे लागणार आहेत. त्याची शालेय दप्तरी नोंद ठेवावी लागणार आहे.

14 जानेवारीला भोगी व 15 रोजी मकरसंक्रांतीची अशा महापालिका हद्दीतील सर्वच शाळांना सलग दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळांना मात्र 15 जानेवारी रोजीच सुट्टी आहे. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी 30 एप्रिल ते 13 जून तर, शिक्षकांसाठी 8 मे ते 13 जून या कालावधीत राहणार आहे. दिवाळी सुट्ट्या 9 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.