पिंपरी – मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघात वास्तव्यास असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना निवडणुकीत मतदान करता यावे, याकरिता सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील मतदान करता यावे, यासाठी नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
येत्या 29 एप्रिलला मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा, याकरिता निवडणूक विभागाने जनजागृतीचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. याशिवाय कंपन्यांमधील कामगारांनादेखील मतदान करता यावे, याकरिता सुट्टी जाहिर करण्याचा आदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर मावळ अथवा शिरूर लोकसभा मतदार संघात वास्तव्य असलेल्या महापालिका सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील मतदान करता यावे, याकरिता सार्वजनिक सुट्टी देण्याचे परिपत्रक महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.
याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनादेखील मतदानाचा हक्क बजावता येईल, यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, अशादेखील सूचना दिल्या आहेत.