पुणे – वर्तमान पत्रातील बातमींपेक्षा अग्रलेखांकडे राजकीय मंडळीचे पुर्वी अधिक लक्ष वेधले जायचे. त्यातही दैनिक प्रभातचे संस्थापक व संपादक वा. रा.कोठारी यांचे अग्रलेख वाचनिय व प्रभावी असायचे, असे म्हणत राष्ट्र्वादी कॉंग्रेस शरदचंंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोठारी यांच्या लिखाणाबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांचे बदलते स्वरुप यावर भूमिका मांडली. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या विविध राजकीय प्रश्नांना उत्तरे दिली.
पुर्वी अग्रलेखांवरुन वर्तमानपत्राचे महत्व व नाव वाचकांच्या लक्षात रहायचे. संपादक व त्यांचे लिखाण हे महत्वाचे ठरायचे. काही नामांकित संपादकाचे अग्रलेख फार गाजत असायचे. त्यात वा.रा.कोठारी यांचाही विशेष समावेश होता, असे पवार यांनी स्पष्ट केले.
प्रिंट व डिजीटल मीडीयामध्ये आता आधुनिक तंत्रामुळे अनेक सुधारणात्मक बदल झाले आहेत. स्पर्धाही वाढलेली आहे. संपादक व त्यांचे विभागही विस्तारलेले असतात. मीडीया राजकीय क्षेत्रात प्रभावी ठरतो आहे. विविध प्रकारच्या निवडणुकांमध्ये मीडीयातील लिखाणांचा मतदारांवरही प्रभाव पडतो आहे.
निवडणुकातील सर्व्हेचाही फायदाच होत असतो, असे मतही पवार यांनी व्यक्त केले आहे. सध्या वृत्तपत्रातील काही बातमींच्या लिखाणाला अदृश्य शक्ती भाग पाडत असून हे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पवार यांनी स्वत: वृत्तपत्रात ट्रेनी रिपोर्टर म्हणुन काम केल्याबाबतचे अनेक अनुभव सांगितले. त्यानंतर राजकीय जीवन व मीडीयाचे महत्व, आव्हाने यावरही त्यांनी भाष्य केले.