डेहराडून – उत्तराखंडचे मंत्री मदन कौशिक यांनी सोमवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याबरोबरची जाहीर चर्चा टाळली. त्यामुळे कौशिक यांच्यासाठी व्यासपीठावर राखून ठेवण्यात आलेली खुर्ची रिकामीच राहिली.
भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. ती निवडणूक लढवण्याची तयारी आपने चालवली आहे. त्यातून सिसोदिया वारंवार उत्तराखंडचा दौरा करत आहेत. त्यामुळे आप आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
त्याला दिल्ली विरूद्ध उत्तराखंडचे विकास मॉडेल असे स्वरूप आले आहे. त्यावरून जाहीर चर्चा करण्याचे आव्हान सिसोदिया यांनी दिले. ते आव्हान कौशिक यांनी स्वीकारले. त्यानंतर सिसोदिया यांच्या उपस्थितीत उत्तराखंडमध्ये एक कार्यक्रम झाला.
त्या कार्यक्रमात कौशिक यांच्यासाठी एक खुर्ची राखून ठेवण्यात आली. मात्र, कौशिक न आल्याने सिसोदिया यांनी सत्तारूढ भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
उत्तराखंडच्या विकासाबाबत दाखवण्यासारखे भाजपकडे काहीच नाही. त्यामुळे कौशिक जाहीर चर्चा करण्यासाठी आले नाहीत. उत्तराखंडमध्ये भाजपच्या चार वर्षांच्या राजवटीत केवळ भ्रष्टाचार फोफावला, अशी टीका सिसोदिया यांनी केली.