Char Dham Yatra: उत्तराखंड मधील चारधाम यात्रेदरम्यान अवघ्या २६ दिवसांत ३८ भाविकांचा विविध आरोग्यविषयक कारणांमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. उंच प्रदेशातील आजार, हृदयविकाराचा झटका आदी कारणांमुळे हे मृत्यू झाल्याचे राज्य आपत्कालीन संचालन केंद्राच्या (SEOC) अहवालात नमूद करण्यात आले आहे. चारधाम यात्रा १९ एप्रिल रोजी गंगोत्री मंदिर आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे उघडल्यानंतर सुरू झाली. त्यानंतर केदारनाथ मंदिल २२ एप्रिलला, तर बद्रीनाथ मंदिर २३ एप्रिलला भाविकांसाठी खुले करण्यात आले. अहवालानुसार, केदारनाथ येथे सर्वाधिक २१ भाविकांचा मृत्यू झाला. बद्रीनाथमध्ये सात, तर गंगोत्री आणि यमुनोत्री येथे प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत ११.८१ लाखांहून अधिक भाविकांनी चारधाम यात्रा पूर्ण केली आहे. त्यामध्ये केदारनाथ येथे सर्वाधिक ४.९१ लाख भाविकांनी दर्शन घेतले. बद्रीनाथ येथे ३.०२ लाख, यमुनोत्री येथे १.९४ लाख, तर गंगोत्री येथे १.९२ लाख भाविकांनी भेट दिली. चारधाम आणि हेमकुंड साहिब यात्रेसाठी नोंदणीचा आकडा ३३.९६ लाखांवर पोहोचला आहे. त्यात केदारनाथसाठी सर्वाधिक ११.६८ लाख, बद्रीनाथसाठी १०.१९ लाख, गंगोत्रीसाठी ५.९० लाख आणि यमुनोत्रीसाठी ५.६९ लाख नोंदण्या झाल्या आहेत. हेमकुंड साहिब यात्रेसाठी ४८ हजारांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. राज्यात १४ मे रोजीसाठी ८९,७२७, तर १५ मे रोजीसाठी ९१,२६७ नोंदण्या झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.