लखनौ : लोकसभा निवडणूक निकालातून उत्तरप्रदेशचे चित्र स्पष्ट झाले. आता २०२७ यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव निश्चित आहे, असा दावा समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी केला. उत्तरप्रदेशात लवकरच विधानसभेच्या १० जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी सपने तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून अखिलेश यांनी पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
पोटनिवडणुकीत सत्तारूढ भाजप सर्व जागा गमावेल. त्यानंतर २०२७ मध्ये सप उत्तरप्रदेशात सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत सपचे ३७ उमेदवार विजयी झाले. त्यांच्या निवडीतून जागरूक जनतेने सपला देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनवले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नोटबंदी, जीएसटीवरून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात आलेल्या अपयशावरून अखिलेश यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तरप्रदेशात अनपेक्षितपणे मोठा हादरा बसला. त्या निवडणुकीत सप आणि कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमुळे उत्तरप्रदेशातील राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागणार आहे.