उत्तरप्रदेशात गॅंगस्टर्सचे राज्य असायचे, आता ते तुरूंगात ;पंतप्रधान मोदींचा दावा

अलिगड – उत्तरप्रदेशात 2017 पुर्वी टोळीवाल्यांचे राज्य असायचे पण आता या राज्यातील हे गॅंगस्टर्स तुरूंगात आहेत योगी अदित्यनाथ यांनी त्यांना हा कारागृहाचा रस्ता दाखवून उत्तरप्रदेशातील स्थिती बदलली आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पुर्वी उत्तरप्रदेशातील गरीबांसाठीच्या कल्याणकारी योजनांमध्ये अनेक अडथळे आणले जायचे, पण आता हे सारे अडथळे दूर झाले असून लोकांना थेट मदत मिळू लागली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

अलिगड मध्ये राजा महेंद्रप्रताप सिंह विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अलिगड जिल्ह्याच्या लोढा गावात 92 एकर जागेवर हे विद्यापीठ उभारले जाणार आहे. अलिगड विभागातील 395 महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न असणार आहेत. राजा महेंद्रप्रताप सिंह हे जाट समाजातील द्रष्टे नेते होते. तसेच ते समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिकही होते.

उत्तरप्रदेशाताल आगामी निवडणुकांमध्ये जाट समुदायाला आपलेसे करण्यासाठी योगी सरकारने त्यांच्या नावाने हे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करायचे ठरवले आहे. शेतकरी आंदोलनाच्या निमीत्ताने जाट समाज भाजप पासून दूर गेल्याचे मानले जात असल्याने त्यांना आपलेसे करण्यासाठी करण्यात आलेली ही राजकीय खेळी मानली जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल याही उपस्थित होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.