नवरदेव गायब झाला अन् वरातीत आलेल्या पाहुण्यानेच नवरीसोबत बांधली लग्नगाठ; लग्नाची सर्वत्र चर्चा

लखनऊ – उत्तर प्रदेश येथे वरातीत आलेल्या पाहुण्यानेच नवरीसोबत लग्नगाठ बांधल्याची एक अजब घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.

घडले असे की, उत्तर प्रदेशमधील नरवल येथे शुक्रवारी संबंधित लग्नसमारंभामध्ये वरमाळा घालण्याची वेळ आली आणि अचानक नवरदेव लग्नातून गायब झाला. ऐन समारंभातून नवरदेव गायब झाल्याने उपस्थित सर्वच आश्चर्यचकीत झाले. या कारणामुळे वर-वधु दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. नवरदेवाचा सगळीकडे शोध घेण्यात आला. मात्र नवरेदवाचा कुठेच सापडेना. नवरदेव गायब झाला नव्हता तर तो स्वतःच पळून गेला असल्याचे समजले.

नवरदेव पळून गेल्याचे कळताच नवरीकडच्या लोकांची रडून परिस्थिती वाईट झाली. अखेर त्यांनी हे स्थळ सुचवणाऱ्या पाहुण्यांनाच गाठले आणि या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली. यादरम्यान वरातीत नवरदेवासोबत आलेला एक तरुण नवरीसोबत लग्नासाठी तयार झाला. त्याने नवरीच्या घरच्यांसमोर हा प्रस्ताव ठेवला. यानंतर वरातीत आलेल्या तरुणासोबतच नवरीने सात फेरे घेतले.

दरम्यान, संपूर्ण प्रकारानंतर दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मुलीकडच्या लोकांनी आधीच्या नवरदेवाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर मुलाच्या घरच्यांनी त्याला शोधण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाणं गाठलं आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.