सहारणपूर (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील माधोपूर येथे दोन कुटुंबातील वादादरम्यान एक पत्रकार आणि त्यांच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आशिष आणि आशुतोष अशी या भावांची नावे आहेत. आशिष हे एका हिंदी दैनिकासाठी काम करत होते.
शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये गायीचे शेण दारात टाकण्यावरून भांडण झाले होते. या भांडणाचे पर्यावसन लवकरच हाणामारीमध्ये झाले. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी परस्परांना काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. याच दरम्यान विरोधी कुटुंबातील सदस्याने आशिष आणि आशुतोष यांच्यावर गोळीबार केला, असे पोलिस अधिक्षक विनीत भटनागर यांनी सांगितले.
आशिष आणि आशुतोष या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात् आले असून पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आशिष आणि आशुतोष यांच्या कुटुंबाचा मद्यविक्रीचा व्यवसाय आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांच्या सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.