उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री म्हणतात…

लखनौ – शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे उद्या शिवसेनेच्या १८ नवनिर्वाचित खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. देशातील लोकसभा निवडणुकांपूर्वी देखील शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब अयोध्या दौरा केला होता. उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या अयोध्या दौऱ्यावेळी शिवसेना आणि भाजपमधील संबंध कमालीचे ताणलेले होते.

आपल्या पहिल्या अयोध्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी, ‘पहले मंदिर फिर सरकार’ असा नारा बुलंद केल्याने महाराष्ट्रातील २०१४च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणे २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील राज्यात शिवसेना-भाजप स्वबळावर लढणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र नंतर भाजप अध्यक्ष अमित शहांनी यशस्वी मध्यस्थी करत शिवसेना-भाजपला पुन्हा एकदा एकत्र आणले होते. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्ववभूमीवर यावेळी देखील, शिवसेना भाजपचा कळीचा असलेला राम मंदिराचा मुद्दा ‘हायजॅक’ करत आहे काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री के पी मौर्य यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांनी मौर्य यांना ‘शिवसेना भाजपचा राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करत आहे का?’ असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “राम मंदिर हा काही राजकीय मुद्दा नसून हा श्रद्धेचा मुद्दा आहे. जे राम जन्मभूमीला भेट देऊ इच्छितात त्यांचं आम्ही स्वागतचं करतो. लवकरच राम मंदिर बांधलं जाईल असा मला विश्वास आहे.”

अयोध्या दौऱ्यावर येणाऱ्या शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री के पी मौर्य यांनी स्वागत केले असल्याने भाजप अध्यक्ष अमित शहांनी सांगितल्याप्रमाणे भाजप-शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.