दोनच दिवसांपूर्वी झाली होती निवड
आग्रा – उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला बार कौन्सिल अध्यक्षांची आग्रा येथील सत्र न्यायालयाच्या आवारात त्यांच्या सहकारी वकिलानेच गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. दर्वेश यादव (वय, 38) असे हत्या झालेल्या अध्यक्षांचे नाव आहे. तर मनिष शर्मा असे मारेकराचे नाव आहे. दर्वेश यादव यांची दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
आग्रा न्यायलयातील कार्यालयात त्यांच्या अभिनंदनासाठी आयोजित समारंभ झाल्यानंतर ही घटना घडली. मनिष शर्मा याने गोळीबार केल्यानंतर दर्वेश यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरात तणाव वाढला असून वकिलांच्या गटांनी उद्यापासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. दर्वेश यादव बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच कोर्टात आल्या होत्या. कार्यक्रम सुरु असताना मनिष शर्मा याने दर्वेश यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर शर्मा याने स्वत:वरही गोळी झाडली. यात तो गंभीर झाला असून तेथील स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे आग्य्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अजय आनंद यांनी सांगितले.