निवडणुकांत आक्रमक प्रचार करावाच लागतो

निवडणूक आयोगाच्या हरकतीवर आदित्यनाथ यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – निवडणुकांच्या प्रचारसभा या विरोधकांवर टीका करण्यासाठी आणि त्यांच्या चुका जनतेला दाखवण्यासाठी असतात. प्रचारसभा या फक्त गोड बोलण्यासाठी नसतात असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले आहे. निवडणुकांच्या प्रचारसभेत केलेल्या वक्‍तव्यावरून आदित्यनाथ चर्चेत आले आहेत. वादग्रस्त विधान केल्याने निवडणूक आयोगाने त्यांना 72 तास प्रचार करण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता बाबर की औलाद असे वक्‍तव्य केल्याप्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्‍तव्य केले आहे.

निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटीसबाबत विचारले असता आदित्यनाथ म्हणाले, भजन करण्यासाठी कोणी प्रचारसभा घेतो काय, विरोधकांवर टीका करण्यासाठी आणि त्यांचे दोष, चुका जनतेला दाखवण्यासाठी सभा घ्यायच्या असतात. विरोधकांवर आरोप करताना सौम्य शब्दांत कसे करणार, त्यासाठी आक्रमक भाषा वापरावी लागते असे त्यांनी सांगितले.

निवडणूक प्रचारात समाजवादी पक्ष किंवा विरोधकांनी आम्हाला शिव्या दिल्या, आमच्यावर आरोप केले, आमचे दोष दाखवले तर आम्हाला राग येण्याचे काहीच कारण नाही. प्रचारसभा या त्यासाठीच घ्यायच्या असतात, असेही ते म्हणाले.
संबळमधील एका प्रचारसभेत आदित्यनाथ यांनी सपा आणि बसपा उमेदवाराला बाबर की औलाद असे संबोधित केले होते. त्या वक्‍तव्याबाबत निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवून 24 तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

याआधीच्या प्रचारसभेत त्यांनी मुस्लीम लीगच्या झेंड्याचा व्हायरस असा उल्लेख केला होता. तर भारतीय लष्कराला मोदींची सेना असे म्हटले होते. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना 72 तास प्रचार करण्यास बंदी केली होती. त्यातच आता योगी आदित्यनाथ आयोगाला काय उत्तर देतात आणि आयोग काय कारवाई करणार याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.