लखनौ – बहुजन समाज पार्टीचे माजी खासदार आणि माफिया डॉन धनंजय सिंह यांच्या अटकेसाठी पोलिसांनी रोख 25 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. आजमगढ येथील माजी ब्लॉक प्रमुख आणि गुन्हेगार अजित सिंग याच्या हत्येप्रकरणी धनंजय सिंह विरोधात “एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे. धनंजय सिंग याच्या अटकेसाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, असे लखनौचे पोलिस आयुक्त डी.के. ठाकूर यांनी सांगितले.
धनंजय सिंह यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके दिल्ली, हैदराबाद आणि त्याचे मूळ गाव असलेल्या जौनपूर येथे रवाना करण्यात आली होती पण ते सर्व रिकाम्या हाताने परत आले आहेत. धनंजय सिंह यांना अटक करण्यासाठी लखनौ आणि जौनपूर येथे अनेक छापे टाकण्यात आले पण पोलिसांना आतापर्यंत यश मिळालेले नाही.
धनंजय सिंह यांनी आपला प्रतिस्पर्धी अजित सिंह याला संपवण्याची सुपारी दिली होती, असे मारेकरी गिरीधारी याने चौकशीदरम्यान सांगितले होते. गिरीधारी हा पोलिसांबरोबरच्या चकमकीमध्ये मारला गेला होता. तपासादरम्यान धनंजय सिंह यांचे नाव पुढे आल्यावर पोलिसांनी त्यांच्याविरोधात वॉरंट बजावले आहे. तेंव्हापासून धनंजय सिंह फरार आहे आणि आपल्याविरोधातील वॉरंट न्यायालयाकडून रद्द करण्यासाठी प्रयत्नशील आहे.