गोरखपूर: सर्वत्र करोना आणि लॉकडाऊन हेच शब्द कानी पडत आहेत. त्याचा परिणाम नामकरणावरही झाल्याचे दिसून येत आहे. उत्तरप्रदेशातील दोन कुटुंबांनी चक्क बाळांची नावे करोना आणि लॉकडाऊन अशी ठेवली आहेत.
मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यादिवशी उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक बालिका जन्मली. तिचे नाव कुटुंबीयांनी करोना ठेवले आहे. त्याच राज्यातील देवरिया जिल्ह्यात नुकताच एका बालकाचा जन्म झाला. त्या बाळाचे नामकरण कुटूंबीयांनी लॉकडाऊन असे केले आहे. त्या नावांचे दोन्ही कुटुंबांनी समर्थन केले. करोनाच्या फैलावामुळे देशात ऐक्याची भावना आणखी दृढ झाली आहे. त्या विषाणूला रोखण्यासाठी उचलण्यात आलेली लॉकडाऊनसारखी पाऊले योग्यच आहेत. त्यामुळे जनतेला खबरदारी घेण्याची आठवण करून देण्याच्या उद्देशातून आम्ही बाळांची नावे ठेवल्याचे त्या कुटुंबांनी म्हटले. त्या बाळांचा जिथे जन्म झाला; त्या रुग्णालयांनीही त्यांना करोना आणि लॉकडाऊन ही नावे देण्यात आल्याची पुष्टी केली.