लखनौ, दि.18 -बसपपाठोपाठ समाजवादी पक्षानेही (सप) उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. त्या निवडणुकीत सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांचे दुरावलेले काका शिवपाल यादव यांच्यात समझोता होण्याची चिन्हे आहेत.
बसपच्या प्रमुख मायावती यांनी काही दिवसांपूर्वी एकला चलो रे चा नारा दिला. त्यानंतर सोमवारी अखिलेश यांनीही सपची रणनीती स्पष्ट केली. सप स्वतंत्रपणे लढणार असला तरी लहान पक्षांशी हातमिळवणी करण्याची आमची तयारी आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शिवपाल यांच्याशी समझोता होणार का, या प्रश्नावर त्यांनी एकप्रकारे होकारार्थी उत्तर दिले. शिवपाल यांच्याविरोधात आम्ही उमेदवार देणार नाही. सपला सत्ता मिळाल्यास शिवपाल यांनाही मंत्रिपद दिले जाईल, असे त्यांनी म्हटले.
मागील विधानसभा निवडणुकीआधी शिवपाल आणि अखिलेश या काका-पुतण्यामधील मतभेद विकोपाला गेले. त्यातून शिवपाल यांनी प्रगतीशील समाजवादी पक्षाच्या रूपाने स्वतंत्र राजकीय चूल मांडली. मात्र, त्या पक्षाला स्वत:चा प्रभाव पाडता आला नाही. मागील काही दिवसांपासून शिवपाल समझोत्याचा प्रस्ताव देत आहेत. आता त्याला अखिलेश यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसते.