उ. प्रदेशात करोनाचं थैमान! एका रात्रीत 16 मृत्यू पाहिलेल्या रुग्णाने ऑक्सिजनसाठी गाठली मुंबई; वाचला जीव

मुंबई : देशभरात करोनाने थैमान घालत आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला महाराष्ट्राला करोना संसर्गाने मोठा फटका बसला. मात्र राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे महाराष्ट्रात करोना संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. मात्र देशातील इतर राज्यांमध्ये करोनाने हाहा:कार माजवला आहे. उत्तर प्रदेशात तर आरोग्य सुविधा कोलमडली असून उपचारासाठी रुग्ण महाराष्ट्रात धाव घेत आहेत. एका ५० वर्षीय रुग्णाने उपचारासाठी मुंबई गाठली. त्यामुळे त्याचा जीव वाचल्याचं समोर आलं आहे.

ऑक्सिजन मिळावा म्हणून मूळचे उत्तर प्रदेशचे राहणारे मोहम्मद शमशाद खान यांनी तब्बल 1500 किलोमीटरचा प्रवास करत मुंबई गाठली. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन मिळत नसल्यानं मोहम्मद शमशाद खान यांच्या कुटुंबीयांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला होता.

खान यांना 21 एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. खान यांना उत्तर प्रदेशात बेड मिळाला पण ऑक्सिजन मिळाला नाही. मोहम्मद शमशाद खान यांना ऑक्सिजनची गरज होती. मात्र, दोन दिवसांनी डॉक्टरांनीही हात वर केले. ऑक्सिजन वेळेवर मिळत नव्हता. त्यामुळे जीवाचं कधी ही बर वाईट होईल अशी स्थिती होती. अशा अवस्थेत मोहम्मद शमशाद खान यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मुंबईला आणण्याचा निर्णय घेतला. येथे त्यांचा जीव वाचला.

‘उत्तर प्रदेशात रुग्णालयात होतो तिथं एका रात्रीमध्ये 16 ते 17 जणांचा डोळ्यासमोर मृत्यू झाला. हे पाहून मी देखील जगतोय की नाही, असं वाटू लागलं होतं. मात्र, घरच्यांनी धीर दिला आणि मुंबईला आणलं. 17 ते 18 दिवस रुग्णालयात होतो, आता तब्येत बरी आहे’, असं मोहम्मद शमशाद खान यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.