माळशिरस : माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रथमच विधानसभेत निवडून गेलेले शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार उत्तम जानकर हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. हा राजीनामा 23 जानेवारी रोजी दिल्लीला मुख्य निवडणूक आयोगाकडे ते सादर करणार आहेत. माळशिरस येथील पोटनिवडणूक तातडीने जाहीर करावी. ही निवडणूक बॅलेट पेपरवर किंवा व्हीव्हीपॅट दिसेल अशा पद्धतीने घेण्याची मागणी त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात केली आहे. भाजपचे राम सातपुते यांचा पराभव करून ते आमदारपदी निवडून आले होते. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत मिळालेल्या अपेक्षेपेक्षा कमी मताधिक्यामुळे ते नाराज असल्याचे समजते.
मताधिक्क्याबाबत नाराजी आणि बॅलेट पेपरबाबत आक्रमक भूमिका
उत्तम जानकर यांना २०२४ च्या विधानसभेत अपेक्षित असे मताधिक्य मिळाले नाही. यामुळे त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी मतदारांची इच्छा पूर्णपणे दिसून येण्यासाठी बॅलेट पेपरवर फेर निवडणुकीसाठी आग्रह धरला होता. यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे वारंवार विनंती केली. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांच्या मागणीला स्पष्ट नकार दिला.
मारकडवाडीत बॅलेट पेपर प्रयोग फसला
उत्तम जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घेण्याचा एक प्रयोग केला होता. परंतु, निवडणूक आयोगाने हा प्रयोग अमान्य ठरवत थेट रद्द केला. या निर्णयामुळे ते अधिकच नाराज झाले आणि त्याचा परिपाक म्हणून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असे सांगितले आहे .
राजीनामा देणार या वक्तव्यामुळे मतदारसंघात चर्चेनां उधाण
उत्तम जानकर यांच्या राजीनाम्यामुळे माळशिरस मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जानकर यांचा राजीनामा आणि बॅलेट पेपरसंदर्भातील त्यांची आक्रमक भूमिका राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनला आहे.