Uttam Jankar । माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. कारण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आलेले उत्तम जानकर यांना थेट आमदारकीची ऑफर देण्यात आली. मात्र तरीही जानकर आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला लांब ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भाजपच्या अडचणी तशाच असल्याचे दिसतंय. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या पाठिंबा मिळवत माढा लोकसभा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आणि माळशिरस तालुक्यातील तुल्यबळ नेता अशी ओळख म्हणून उत्तम जानकर याना ओळखलं जातं. जानकरांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दोनवेळा बैठक घेतली होती. यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जानकर यांच्यासाठी खास विमान पाठवून त्यांना नागपूर येथे बोलावण्यात आलं.
19 एप्रिलला मोठा निर्णय घेणार Uttam Jankar ।
नागपूरच्या बैठकीनंतर,”कार्यकर्त्यांशी चर्चा करून मगच काय निर्णय घ्यायचा हे 19 एप्रिल रोजी ठरणार असल्याने आपण फडणवीस यांना तसं कळवू, असं जानकर यांनी सांगितलं आहे. मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर फडणवीस हे ॲक्टिव मोडवर येऊन त्यांनी तातडीने जानकर यांना खास विमान पाठवलं होतं.
सोमवारी उत्तम जानकर यांच्यासोबत खासदार रणजित निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार जयकुमार गोरे आणि पांडुरंग वाघमोडे हे नागपूरला पोहोचले होते. यावेळी फडणवीस यांच्यासोबत तासभर झालेल्या चर्चेत जानकर यांचं समाधान झालेलं आहे. मात्र आता सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन 19 एप्रिलला निर्णय केला जाणार असून जो निर्णय होईल त्याच्या प्रचारासाठी उतरणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत जानकर यांनी गेल्या 10 वर्षात भाजपकडून कसा अन्याय झाला, याचा पाढाच वाचल्यावर फडणवीस यांनी हे मान्य करीत यापुढे ताकद देण्याचं आश्वासन दिलंय.
उत्तम जानकरांना आमदारकीची ऑफर Uttam Jankar ।
उत्तम जानकर यांना विधानसभा किंवा विधान परिषदेतून आमदार करण्याचा शब्द फडणवीस यांनी दिला असला तरी मंत्रिपदाबाबत मात्र शब्द दिला नसल्याची कबूली दिली आहे. यंदा विधानसभा दोन महिने अलीकडे म्हणजे ऑगस्टमध्ये घेण्याच्या हालचाली असल्याने आपल्याला विधानसभेची उमेदवारीही मिळू शकेल किंवा विधान परिषदेतून आमदारकी मिळेल, असं जानकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.