न्यायाधीशांचा अपघात की खून? सीबीआयचा झारखंड उच्च न्यायालयात ‘महत्वपूर्ण’ खुलासा

धनबाद – जिल्हा सत्र न्यायाधीश उत्तम आनंद मृत्यु प्रकरणामध्ये आज सीबीआयने झारखंड उच्च न्यायालयामध्ये महत्वपूर्ण खुलासा केला. ‘ड्रायव्हरने न्यायाधीश आनंद यांच्या अंगावर जाणूनबुजून टेम्पो घालून त्यांचा खून केल्याचं’ सीबीआयने फॉरेन्सिक रिपोर्ट व तपासानंतर म्हंटल आहे.

तपासातील प्रगतीबाबत आज सीबीआयने झारखंड उच्च न्यायालयाला माहिती दिली. सीबीआयने या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी देशभरातून चार फॉरेन्सिक टीमला पाचारण केले होते अशी माहिती मिळत आहे.  

तत्पूर्वी, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ४९ वर्षीय जिल्हा सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांचे अपघाती निधन झाल्याची घटना २८ जुलैला घडली होती. मात्र याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्यानंतर हा अपघात नसून घातपात असल्याबाबतची शंका निर्माण झाली होती. या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाने देखील घेतली होती. याबाबतचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने याबाबतचा सखोल तपास, क्राईम सिन क्रिएट करणे, सीसीटीव्ही फुटेजचे थ्रीडी विश्लेषण, फॉरेन्सिक अहवाल या आधारांवर न्यायाधीश आनंद यांचा अपघात नसून त्यांचा खून करण्यात आला असल्याचं म्हंटल आहे.

न्यायाधीश आनंद २८ जुलैच्या पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही ते घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने याबाबतची माहिती रजिस्टार यांना दिली. रजिस्टार यांनी शहराचे सुप्रीटेंडेंट ऑफ पोलीस यांना ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरु केली. काही वेळाने न्यायाधीश आनंद जखमी अवस्थेत सापडले. त्यानं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

सीबीआयने दोन आरोपींची ब्रेन मॅपिंग टेस्ट केली असून त्याबाबतच्या अहवालाचे अध्ययन सध्या सुरु आहे, अशी माहिती मिळाली आहे. सीबीआय या गुन्ह्याच्या तपासाच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचं कळतंय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.