पुणे – गेल्या काही वर्षांपासून नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना अनेकजण तुका म्हणे.. हा शब्दप्रयोग करून त्यापुढे विचित्र शब्द लिहून शुभेच्छा देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता देहू येथिल संत तुकाराम महाराज संस्थानने कठोर पाउले उचलली आहेत. तुका म्हणे शब्दप्रयोग करून शुभेच्छा दिल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिला आहे.
संत तुकाराम महाराज हे महान संत होते. त्यांनी हजारो अभंग लिहून जनजागृती आणि भगवद्भक्तीचा मार्ग दाखविला आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक अभंगाच्या शेवटच्या ओळीत तुका म्हणे.. हा शब्दप्रयोग आहे. तो अभंग त्यांचा असल्याची ती खुण आहे. मात्र काही जण त्यांच्या या तुका म्हणे शब्दाचा प्रयोग करून विचित्र मेसेज तयार करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संतांचा अवमान होत आहे म्हणून आता देवस्थानने अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना चुकुनही तुका म्हणे या शब्दाचा वापर करू नका. अन्यथा कठोर कारवाईला समोरे जावे लागले.