आरटीआयचा वापर केल्याने चालकाची बदली

पुणे  – पुणे महानगर परिवहन महामंडळामधील (पीएमपी) प्रशासनातील सेवा ज्येष्ठता, वार्षिक रजा आदींबाबतच्या माहितीसाठी माहिती अधिकार (आरटीआय) कायद्याचा वापर केल्याने चालकाची बदली करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील संबंधित चालक हडपसर स्थानकात काम करत होता. त्यांची सध्या स्वारगेट स्थानकात बदली करण्यात आली आहे.

चालकाबाबत हडपसर स्थानक प्रमुखांनी वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल सादर केला होता. यामध्ये, चालकाला नाईट ड्युटीची सवय, रजा मागणे आणि आरटीआय कायद्याचा वापर करीत असल्याचे नमूद केले. अहवाल पाहून वरिष्ठांनी एकतर्फी निर्णय घेऊन आपली बदली केल्याचा आरोप “पीएमपी’चे चालक वसंत समगिर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

समगिर म्हणाले, मी हडपसर डेपोमध्ये कायम चालक म्हणून 25 वर्षांपासून काम करीत आहे. या स्थानकाचे प्रमुख सोमनाथ वाघोले असून जून महिन्यात मी त्यांच्याकडे रजा मागितली होती. मात्र, तीन रजा झाल्याचे कारण देत वाघोले यांनी चौथी रजा नामंजूर केली. यावेळी इतर कर्मचाऱ्यांना तीनपेक्षा अधिक रजा देण्यात आल्याची माहिती मला आरटीआयमध्ये मिळाली. यामुळे, केवळ मलाच रजा नामंजूर करणे व वाघोले सतत त्रास देत असल्याबाबत मी मुख्य व्यवस्थापकीय संचालकाकडे 2 जुलै रोजी तक्रार केली होती.त्यानंतर मुख्य संचालकांनी या प्रकरणात लक्ष घालून वाघोले यांना सविस्तर अहवाल देण्याचे सांगितले, असे वसंत समगिर यांनी सांगितले.

या प्रकरणात संबंधित चालकाबाबत स्थानकप्रमुखांनी सादर केलेला अहवाल विचारात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत या प्रकरणाची चौकशी सुरू असून चालकाला बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. तसेच चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी 

Leave A Reply

Your email address will not be published.