नवी दिल्ली : कोरोनाच्या आव्हानाशी सामना करण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने त्यांनी कुष्ठरोगावरील उपचारासाठी तयार केलेले त्यांचेच एक औषध मायकोबॅक्ट्रियम डब्ल्यू (एमडब्ल्यू) हे कोरोना विषाणूवरील उपचारासाठी प्रभावी ठरेल असे म्हटले आहे. कोरोना विषाणूवरील उपचारासाठी याचा वापर करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल यांच्या परवानगीसाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
जम्मू येथील सीएसआयआरची प्रयोगशाळा इंडियन इन्सिट्टयूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीनचे संचालक डॉ. राम विश्वकर्मा यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना ही माहिती दिली. मायकोबॅक्ट्रियम हे मूलतः कुष्ठरोगावरील उपचारासाठी वापरले जात असल्याचे सांगितले.
हे औषध शरीरात बाहेरील संक्रमण रोखण्यासाठी प्रतिरोधक क्षमता निर्माण करते. ज्याप्रकारे कोरोनाच्या संक्रमणात साइटोकाईन्सची अति सक्रियता दिसून आली. ती अत्यंत नुकसानकारक असल्याचे अंतर्गत अभ्यासात आढळून आले आहे.
दरम्यान, साईटोकाईन्स रोगप्रतिकारक पेशींद्वारे उत्पन्न केले जाणारे प्रोटीन आहे. अनेक पेशींची यामुळे निर्मिती होते. याची उपस्थिती शरीरातील प्रतिरोधक तंत्र सक्रिय आणि नियंत्रित ठेवते. कोरोनाच्या संक्रमणात साईटोकाईन्स अति सक्रिय होतात आणि यामुळे प्रतिकारक तंत्र काम करत नाही, असेही आढळून आले आहे.