बाहेरून दाखवायचो नाही पण एकटा असताना डोळ्यातून अश्रू यायचे – शरद पवार

२००३ साली कळलं की मला कॅन्सर आहे कॅन्सर समजताच माणूस पूर्ण घाबरतो पण माझा आत्मविश्वास कमी झाला नाही

उस्मानाबाद: १९९३ सालच्या ३० सप्टेंबरला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३.५६ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत एक भूकंप झाला, त्याला लातूरचा भूकंप म्हटले जाते. ह्या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस ७० किमी अंतरावर होते. रिश्टर स्केलवर ६.०४ तीव्रता मोजला गेलेल्या ह्या भूकंपात अंदाजे ७,९२८ माणसे मृत्युमुखी पडले, १५,८५४ जनावरांचा मृत्यू झाला, तर सुमारे १६,००० लोक जखमी झाले. ५२ गावांतील ३० हजार पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी तेव्हाच्या काही आठवणी सांगितल्या, “१९९३ला आपण आत्मविश्वासाने संकटांना तोंड दिलं त्याचं स्मरण करणारा आजचा दिवस. ३० सप्टेंबरला पहाटेच भूकंप झाला. तात्काळ निघत सकाळीच इथे हजर झालो, यंत्रणा कामाला लावली. भयंकर परिस्थिती होती. गावं उद्ध्वस्त झाली, प्रेतांचा सडा समोर होता. जखमींना सावरण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. मला या भागातील जनतेचे कौतुक करावेसे वाटते. संकट कितीही मोठे असले तरी त्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. लोकांनी निर्धार केला आता रडायचे नाही उभे रहायचे. हा आत्मविश्वास पुढे मलाही उपयोगी पडला”.

शरद पवार पुढे म्हणाले, “२००३ साली कळलं की मला कॅन्सर आहे. कॅन्सर समजताच माणूस पूर्ण घाबरतो. पण माझा आत्मविश्वास कमी झाला नाही. हा आत्मविश्वास मला उस्मानाबाद, लातूर या परिसरातील भूकंपग्रस्त लोकांमुळे मिळाला. संकट येतात त्याला आत्मविश्वासाने तोंड द्यायला हवं हे मी इथल्या लोकांकडून शिकलो. या भूकंपाच्या वेळी विलासराव देशमुख यांनी लातूरची तर पद्मसिंह पाटील यांनी उस्मानाबादची जबाबदारी सांभाळली. तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी जागतिक बँकेकडून मदत मिळवून दिली. एवढ्या मोठ्या संकटातही इथल्या जनतेने शेतीची साधनं दिल्यानंतर काळ्या आईची इमानेइतबारे सेवा केली”.

हे सगळं पाहत असताना बाहेरून दाखवायचो नाही पण एकटा असताना डोळ्यातून अश्रू यायचे. रात्रभर झोप येत नसे. पण जनतेचा चेहरा समोर यायचा आणि मी सर्व गोष्टी मागे टाकायचो. आजही दुष्काळी परिस्थिती आहे… ठीक आहे आपण त्यावरही मात करू, असा विश्वास शरद पवार यांनी उपस्थितांना दिला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)